स्वारगेट अत्याचारातील पीडितेचा लेटरबॉम्ब; पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, दत्ता गाडेच्या कोठडीतही वाढ
Pune Swargate rape case Update, Datta Gade Custody Extend : पुण्यातील स्वारगेट परिसरात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीने पत्राद्वारे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या पत्रात तिने वैद्यकीय चाचणी, पोलिसांची भूमिका आणि सरकारी वकिलांच्या नियुक्तीबाबत तिला आलेल्या अडचणीविषयी पाढा वाचला. दरम्यान, आरोपी दत्ता गाडे याच्या पोलिस कोठडीत 8 एप्रिल 2025 पर्यंत वाढ झाली आहे. न्यायालयात या प्रकरणात सुनावली पार पडली.
पीडितेने तिच्या पत्रात काय केली मागणी
पीडितेने तिच्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांकडून तिला उशीर झाल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. या आरोपांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्याने इच्छेविरुद्ध तपासणी केल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने तिच्या पत्रात वैद्यकीय आणि पोलीस प्रक्रियेतील त्रासदायक अनुभव मांडले आहेत. वैद्यकीय चाचणीबाबत तिने सांगितले आहे की, पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्या इच्छेविरुद्ध तपासणी केली.
तसेच पोलिस चौकशीदरम्यान तिला अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांसमोर अत्याचाराच्या घटनांचे तपशीलवार वर्णन करावे लागले. पीडितेने तिच्या पत्रात अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करताना म्हटले आहे की, आरोपी दत्ता गाडे याने दोनदा बलात्कार केल्यानंतर पुन्हा लैंगिक जबरदस्तीचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेच्या जोरदार प्रतिकारामुळे तो पळून गेला, असे तिने नमूद केले आहे.
वकील नियुक्तीवरुन पोलिसांवर गंभीर आरोप
या पत्रात सरकारी वकिलांच्या नियुक्तीबाबतही पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी तिला तीन वकिलांची नावे सुचवली, परंतु तिने असीम सरोदे यांची मागणी केली असता, तिला उशीर झाल्याचे सांगण्यात आले. "माझा वकील निवडण्याचा अधिकार नाही का?" असा प्रश्नही तिने पत्रातून उपस्थित केला आहे.
दरम्यान, अत्याचाराच्या घटनेदरम्यान झालेल्या मानसिक स्थितीबद्दलही तिने पत्रात लिहिले आहे. ती ओरडली असता तिचा आवाज अचानक बसला आणि निघेनासा झाला. त्याचवेळी विरोध केल्यामुळे मारल्या गेलेल्या अन्य पीडितांची आठवण तिला झाली. त्यामुळे आपला जीव वाचवणे तिला अधिक महत्त्वाचे वाटले, असेही तिने नमूद केले आहे.
पोलिसांची भूमिका संशयास्पद?
पीडितेच्या आरोपांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. अत्याचारग्रस्त महिलांना न्याय मिळावा यासाठी तिने स्वतः सरकारी वकील निवडण्याचा अधिकार असावा, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांच्या भूमिकेवर आणि पीडितेच्या मागण्यांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आरोपी दत्ता गाडेच्या कोठडीत 8 एप्रिलपर्यंत वाढ
दुसरीकडे, स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडेच्या न्यायालयीन कोठडीत (दि.8) एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी हा आदेश दिला.
त्यामुळे गाडेचा येरवडा कारागृहातील मुक्काम असणार आहे. दरम्यान, आरोपी विरोधात येत्या आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणेपोलिस प्रयत्नशील आहेत.
काय घडली होती नेमकी घटना?
स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३६) याने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, आरोपीला २६ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत संपल्याने आरोपी गाडेला येरवडा कारागृहातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले.












Click it and Unblock the Notifications