पुणे - पुण्यात जोरदार पाऊस पडत असून अनेक घरात पाणी शिरले आहे. याच धर्तीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार हे पु्ण्यात पोहचले आहेत.
दरम्यान, राज्य शासनाने तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या असून पुण्यात एनडीआरएफसह इतर पथकेही पोहचली आहेत. चला जाणून घेऊया पुण्यात पाऊस आणि त्यानंतरची स्थिती
अपडेट्स
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सुरू असलेला 35 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग आज सकाळी साडेदहा वाजता कमी करून 15 हजार क्युसेक करण्यात आला आहे.
पुणे शहरातून वाहणारी मुठा नदी दुथडी भरून वाहत असून शहराच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे.
वारजे, शिवणे, सिंहगड रस्ता एकता नगर, रजपूत झोपडपट्टी, पुलाची वाडी, नागपूर चाळ येरवडा, कोरेगाव पार्क लेन नंबर 7 आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे.
पुणे शहरात एनडीआरएफच्या पथकांना करण्यात आलं असून बोटीही बचाव कार्यात दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दल आणि महापालिका कर्मचाऱ्यांतर्फे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर चालू आहे.
पुलाची वाडी पाटील इस्टेट झोपडपट्टी आणि आदर्श नगर आळंदी रस्ता इथं पाणी शिरल्याने तेथील सुमारे साडेतीनशे नागरिकांना महापालिकेच्या शाळेत आणि सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलाव पूर्णपणे भरला असून तेथील पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. डेक्कन जिमखाना पुलाची वाडी येथे काल रात्री विजेचा धक्का लागल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
इंद्रायणी पूल पाण्याखाली
पुणे महानगर पालिका हद्दीत बालेवाडी ब्रीज, मुळा नदी ब्रीज, संगम रोड ब्रीज, होळकर ब्रीज, संगमवाडी ब्रीज, महर्षी शिंदे ब्रीज, हडपसर- मुंढवा रोड ब्रीज, मातंग ब्रीज, येरवडा शांतीनगर येथील ब्रीज, निंबजनगर ब्रीज, मोई, व चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पुल पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत.
सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले
पुणे महानगर पालिका हद्दीत एकता नगरी सिंहगड रोड वरील द्वारका सोसायटी, शरदा सरोवर सोसायटी, शाम सुंदर सोसायटी, निंबजनगर परिसरातील सोसायटी, सिंहगड रोड, घरकुल सोसायटी पिंपरी चिंचवड, वृंदावन आश्रम आकुर्डी विशालनगर, जगताप डेअरी विणस सोसायटी, कुंदननगर या गृह निर्माण हाउसिंग सोसायटी मध्ये पावसाचे पाणी शिरले आहे.
मदत आणि बचाव कार्य सुरू
निंबजनगर परिसरातील सोसायटी व सिंहगड रोड वरील सोसायट्या मध्ये पाणी शिरल्याने घरात लोक अडकलेली आहेत त्यांना खाद्य पदार्थ आणि पाणी इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे.
भिमाशंकर-खेड रोडवर दरड कोसळली असून खेड मधून भिमाशंकरकडे जाणार रस्ता बंद आहे.
वडघर ता. वेल्हा येथे डोंगराची माती रस्त्यावर आली होती. ती माती बाजूला करून रस्ता वाहतूक सुरू केली आहे.
मौजे-दासवे ता. मुळशी लवासा लेक सिटी येथील बंगल्यावर दरड कोसली आहे. सदर बंगल्यात ३ जण अडकले असल्याबबत प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. एनडीआरएफ टीम काम करत आहे.
त्याच बरोबर पर्यटन स्थळ ठिकाणी 24 तासाकरिता बंदी आदेश जारी करण्यात आहे.
'त्या' 3 मृतांची नावे..
पुणे भिडे पूला शेजारील पूलाचीवाडी येथील 3 युवकांना शॉक लागून मयत झाले आहेत. त्यांची नावे अभिषेक घाणेकर, आकश माने व शिवा परिहार अशी आहेत.
लवासा रोड, (ता. मुळशी) येथे दरड कोसळली असून एनडीआरएफच्या टीमला बचाव कार्यासाठी कळविण्यात आलेले आहे.