'शरीर इकडे, मन तिकडे!' बापू पठारेंच्या राजकीय 'सोयी'वर अजितदादांची मिश्किल फटकेबाजी
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा (Pune Mahapalika Election) रणसंग्राम सुरू असतानाच, वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे (Bapu Pathare) सध्या स्वतःच्याच 'राजकीय भूमिकेमुळे' कोंडीत सापडले आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "बापू फक्त शरीराने आमचे आमदार आहेत, मनाने कुठे आहेत ते सगळ्यांना ठाऊक आहे" असा मिश्किल टोला लगावला आहे. तर दुसरीकडे आमदार माऊली कटके यांनी पठारे यांच्या 'घराणेशाहीवर' प्रश्नांची सरबत्ती करत जोरदार हल्ला चढवला आहे.

"मुलगा कुठे, सून कुठे?" अजित पवारांची टोलेबाजी
नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले की, 'तुमचे आमदार बापू पठारे सध्या नेमके कुठे आहेत?' यावर आपल्या खास शैलीत उत्तर देताना अजितदादा म्हणाले, "ते फक्त शरिराने आमचे आमदार आहेत. त्यांचं मन कुठे आहे? त्यांनी मुलाला कुठे पाठवलं आणि सुनेला कुठे पाठवलं? असे म्हणत अजित पवारांनी बापू पठारेंच्या राजकीय निष्ठांबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.
माऊली कटकेंचा प्रहार
अजित पवारांच्या टीकेनंतर आमदार माऊली कटके यांनी देखील बापू पठारेंच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला. कटकेंच्या टीकेतील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
- घराणेशाहीचा कळस: एकाच घरात तीन-तीन तिकिटे खेचून आणणाऱ्या पठारे परिवारावर कटकेंनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. "सामान्य कार्यकर्त्यांवर हा अन्याय असून, जनतेला गृहीत धरण्याचा अहंकार जनताच उतरवेल," असा इशारा त्यांनी दिला.
- संधीसाधू राजकारण: दीड वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत असलेले सुरेंद्र पठारे आज भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. बापू पठारे स्वतः राष्ट्रवादीच्या युतीचे आमदार असताना त्यांचे चिरंजीव मात्र दुसऱ्या पक्षात, हे नेमके कसले राजकारण? असा सवाल कटकेंनी विचारला आहे.
- टँकरमधून कमाईचा गंभीर आरोप: "आधी पाणी यांच्या विहिरीत येते आणि मग ते टँकरने लोकांपर्यंत विकले जाते," असा खळबळजनक आरोप कटकेंनी केला आहे..
- आमदार 'नॉट रिचेबल': राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असणारे बापू पठारे प्रत्यक्ष मैदानात कुठेच दिसत नाहीत. त्यांनी जनतेसमोर येऊन नेमकी भूमिका स्पष्ट करावी आणि सांगावे की मतदान कोणाला करायचे, असे आव्हान कटकेंनी दिले आहे.
राजकीय विश्लेषकांचे मत
एकीकडे अजित पवारांनी पठारेंच्या दुटप्पी भूमिकेकडे लक्ष वेधले आहे, तर दुसरीकडे माऊली कटकेंनी त्यांच्या स्थानिक वर्चस्वाला आव्हान दिले आहे. यामुळे बापू पठारे यांच्या विरोधात एक प्रकारचे राजकीय वातावरण तयार होताना दिसत आहे. स्वतःच्याच पक्षात असूनही नेतृत्वाचा विश्वास गमावणे आणि विरोधकांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून घेरल्यामुळे आगामी निवडणुकीत पठारे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.












Click it and Unblock the Notifications