रोहिणी खडसे यांचे पती रेव्ह पार्टीत कसे अडकले, पोलिसांनी कशी केली कारवाई, खडसेंच्या विरोधकांचा डाव?
Rohini Khadse, Eknath Khadse Latest News : पुण्यात उच्चभ्रू खराडी परिसरात सुरु असलेल्या एका हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह एकूण ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, हुक्का आणि दारू जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे ही कारवाई अशा वेळी झाली, ज्यावेळी सद्या खडसे व महाजन यांच्यातील वाद खूप अटीतटीवर आलेला आहे. अशातच ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
नेमकी काय घडली घटना?
पुण्यातील खराडी येथील रॅडीसन हॉटेलच्या मागील एका अपार्टमेंटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरु होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला या पार्टीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा पार्टीमध्ये दोन तरुणी आणि पाच पुरुष असे एकूण सात जण उपस्थित होते.

कोणाकोणाला घेतले ताब्यात?
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) याचा समावेश आहे, जो राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा पती आहे. त्याच्यासोबतच प्रसिद्ध बुकी निखिल पोपटा यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांव्यतिरिक्त आणखी पाच जणांनाही या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे.
- पुणे शहर पोलीसांची रेव पार्टीवर मोठी कारवाई
— Pritam Purohit (@Pritampurohit31) July 27, 2025
- खराडी परीसरात रेव पार्टीवर पोलीसांचा छापा
- मध्यरात्री साडे तीन च्या सुमारास कारवाई
- मोठ्या प्रमाणात दारु, गांजा आणि हुक्का पोलीसांनी केला जप्त
- पाच पुरुष आणि दोन महिलांना कारवाईत पोलिसांनी घेतले ताब्यात
- #pune pic.twitter.com/9L8i4LhyQN
काय काय सापडले घटनास्थळी?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या फ्लॅटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरु होती, तिथून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, गांजा, हुक्का आणि दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व वस्तूंची सखोल तपासणी केली जात आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींना वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे.
तीन महिला फरार, पोलीस शोधमोहिमेत
या धक्कादायक कारवाईदरम्यान, पार्टीत उपस्थित असलेल्या आणखी तीन महिला पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलीस आता या फरार महिलांचा कसून शोध घेत आहेत. या महिलांचा शोध लागल्यानंतर या पार्टीमागील सूत्रधार आणि अंमली पदार्थांच्या स्त्रोताबद्दल अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.
या कारवाईमुळे पुन्हा एकदा शहरांतील अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सातही जणांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे. या घटनेमुळे उच्चभ्रू वर्तुळात अंमली पदार्थांचे सेवन किती प्रमाणात वाढले आहे, याचा प्रत्यय येत आहे.
खडसे-महाजन वादही रंगला!
दुसरीकडे एकनाथ खडसे यांचे भाजप नेते तथा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात जोरदार वादविवाद चालू आहेत. दोन्ही नेत्यांमधील वाद हा महाराष्ट्रातील चर्चेच्या केंद्रबिंदू असतो. कालच खडसे यांनी महाजन यांना तीन चॅलेंज दिले. तोच शनिवारी रात्री खडसे यांच्या जावई ज्या ठिकाणी रेव्ह पार्टीत होते, त्याच ठिकाणी कारवाई झाली. यामागे काही राजकीय डावपेच असू शकतात, का अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे.












Click it and Unblock the Notifications