Pune News : पुण्यात ट्रकमधून 138 कोटींचे सोने जप्त, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडवर कारवाई
Pune News : राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून पुण्यात नाकाबंदी आणि तपासण्या सुरू झाल्या आहेत. निवडणुकीमध्ये पैसे आणि गैरव्यवहार होऊ नये यासाठी मोठे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. अशातच हिंगोलीत एक कोटी रुपये पकडल्यानंतर आज पुण्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नाकाबंदीदरम्यान तब्बल 138 कोटी रुपयांचे सोने पकडले आहे.
सहकार नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या नाकाबंदीत 138 कोटींचे सोने असलेला ट्रकच पोलिसांनी जप्त केला असून ही कारवाई आज सकाळी करण्यात आली आहे.

सातारा रस्त्यावर कारवाई
सातारा रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास नाकाबंदी पोलिसांनी कोट्यवधीचे सोने जप्त केले आहे. एका संशयित वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात हे सर्व सोन्याचे दागिने सापडले. हे सोने नेमके आले कुठून, कुठे जात होते ? कोणाचे होते याचा तपास आता पोलिस करत आहे.
सोन्याचे दागिने जप्त
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे 138 कोटी रुपये किंमत असलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, डिलिव्हरी ट्रान्सपोर्टची असण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत 90 कोटी 74 लाख रुपयांची मालमत्ता जप्त
2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत 15 ते 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 90 कोटी 74 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून त्यापैकी गेल्या 24 तासात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील 19 अंमलबजावणी यंत्रणांनी एका दिवसात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची कामगिरी बजावली आहे. विविध ठिकाणी वापरलेले पोलिस विभाग आणि इतर यंत्रणांची तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे.












Click it and Unblock the Notifications