पुण्याच्या राजकारणात भूकंप:दोन्ही 'राष्ट्रवादी' पुन्हा एकत्र येणार; जागावाटप अन् गुप्त बैठकाने खळबळ!
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत महत्त्वाची आणि अनपेक्षित घडामोड आकाराला येत आहे. गेल्या काही काळापासून दुभंगलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये पुण्यात झालेल्या 'गुप्त' बैठकीनंतर आता राजकीय चर्चांना उधाण आले असून, भाजपविरोधात ताकद एकवटण्यासाठी दोन्ही गट महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकत्र येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

गुप्त बैठकीचा उलगडा...
पुणे महापालिका निवडणुकीच्या रणनीतीसाठी दोन्ही गटांच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार गटाकडून प्रवक्ते अंकुश काकडे, ॲड. वंदना चव्हाण आणि विशाल तांबे उपस्थित होते, तर अजित पवार गटाकडून आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप यांनी सहभाग घेतला.
या बैठकीत प्रामुख्याने भाजपला रोखण्यासाठी एकत्र लढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती अंकुश काकडे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, अजित पवार यांनी काँग्रेसचे निरीक्षक सतेज पाटील यांच्याशीही प्राथमिक चर्चा केल्याचे समोर आल्याने, ही आघाडी केवळ राष्ट्रवादीपुरती मर्यादित न राहता व्यापक 'महाविकास आघाडी'चे स्वरूप घेताना दिसत आहे.
चिन्हाचा पेच ते वरिष्ठ पातळीवरील निर्णय
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्यास कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, हा सर्वात मोठा तांत्रिक प्रश्न आहे. यावर अद्याप अंतिम शिक्कामोर्तब झाले नसले तरी, याबाबतचा निर्णय दोन्ही गटांचे वरिष्ठ नेते (शरद पवार आणि अजित पवार) घेतील, असे सांगण्यात येत आहे. जागावाटप, निवडणूक रणनीती आणि एकत्र लढण्याचा ठोस आराखडा तयार करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची आज उशिरा एक महत्त्वाची बैठक होणार आहे.
शहराध्यक्ष प्रशांत जगतापांची नाराजी ते 'बंडाचा' पवित्रा
एकीकडे दोन्ही गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असताना, शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र या संभाव्य युतीला कडाडून विरोध केला आहे. "जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, तर मी पक्षाचा राजीनामा देईन," असा इशारा त्यांनी दिला आहे. "अजित पवार सध्या महायुती सरकारचा भाग आहेत, मग त्यांच्यासोबत आघाडी कशी करायची?" "महायुतीमुळे पुण्याचे नुकसान झाले आहे, अशा परिस्थितीत आपण जनतेसमोर कोणत्या तोंडाने मते मागायची?" "पुणेकरांना सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे, तडजोडीच्या राजकारणाची नाही. जगताप सध्या मुंबईत असून ते लवकरच सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. मात्र, त्यांच्या या इशाऱ्याचा वरिष्ठ नेतृत्वावर फारसा परिणाम होताना दिसत नाहीये.
पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार गटाला खिंडार
पुण्यात एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच, शेजारील पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे आणि त्यांची कन्या दीप्ती कांबळे यांनी शरद पवार गटाची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर होणारे हे पक्षांतर स्थानिक समीकरणांवर परिणाम करणारे ठरू शकते.
भाजपची मोर्चेबांधणी आणि ठाकरे गटाला धक्का
राष्ट्रवादीच्या हालचालींना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनेही आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. यामुळे पुण्यात युती, आघाडी आणि पक्षांतराचा मोठा गुंता निर्माण झाला आहे
'पुणे पॅटर्न' राज्याची दिशा ठरणार?
पुणे महानगरपालिकेची ही निवडणूक आता केवळ स्थानिक प्रश्नांपुरती मर्यादित राहिलेली नाही. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले, तर त्याचे पडसाद आगामी विधानसभा आणि राज्याच्या राजकारणावरही उमटू शकतात. कार्यकर्त्यांची नाराजी, नेत्यांची महत्त्वाकांक्षा आणि विचारधारेची लढाई अशा त्रिवेणी संगमात पुण्याच्या राजकारणाची दिशा नेमकी कोणाकडे वळणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications