Pune News पुणे हादरले! अपक्ष उमेदवाराची कार्यालयात आत्महत्या; राष्ट्रवादीच्या उमेदवारावर गंभीर आरोप!
Pune Municipal election : राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सादिक उर्फ बाबू शेख (कपूर) यांनी आपल्या कार्यालयात आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारावर आरोप होत आहेत.

नेमकं प्रकरण काय?
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, सादिक शेख यांनी त्यांच्या कार्यालयात गळफास लावून आपले जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक १० पानांची सुसाईड नोट लिहिली असून, आपल्या हाताच्या पंजावरही काही मजकूर लिहिल्याचे समोर आले आहे. या सुसाईड नोटमध्ये प्रभाग क्रमांक ४१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार फारूक शेख यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
जमिनीचा वाद आणि छळवणूक
पुण्यातील सय्यद नगर भागात असलेल्या ५ गुंठे जमिनीवरून सादिक शेख आणि फारूक शेख यांच्यात जुना वाद सुरू होता. फारूक शेख यांच्याकडून सातत्याने त्रास दिला जात होता आणि याच मानसिक त्रासाला कंटाळून आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सादिक यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. निवडणुकीच्या धामधुमीतच ही घटना घडल्याने हडपसर भागात तणावाचे वातावरण आहे.
पोलिसांकडून गुन्हा दाखल आणि तपास सुरू
या घटनेनंतर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेले सादिक उर्फ बाबू कपूर यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती आणि त्यांच्यावर यापूर्वी 'मोक्का' कायद्यांतर्गत कारवाई देखील झाली होती. मात्र, सुसाईड नोटमधील आरोप गंभीर असल्याने पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
राजकीय वातावरण तापणार
महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच अपक्ष उमेदवाराने आत्महत्या केल्याने आणि त्यात सत्ताधारी गटाशी संबंधित उमेदवाराचे नाव आल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ज्या उमेदवाराचे सुसाईड नोटमध्ये नाव आहे त्याच्यासह अन्य काहीजण अडचणीत येण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications