पुण्यात एटीएसची मोठी कारवाई, बनावट टेलीफोन एक्सचेंजवर छापेमारी, 22 वर्षीय तरुण ताब्यात
पुणे : शैक्षणिक व सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात आज दहशतवाद विरोधी पथकानं मोठी कारवाई केली. कोंढव्यात सुरु असणाऱ्या बनावट टेलीफोन एक्सचेंजवर एटीएस पथकानं आज धाड टाकली. तेथे एटीएसच्या छाप्यात तब्बल 3788 सिम कार्ड, सात सिम बॉक्स, वायफाय आणि सिम्बॉक्स चालवण्याकरता वापरण्यात येणारे अँटिना, लॅपटॉपसह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केला आहे.
ऐन गणेशोत्सवाच्या आधी ही कारवाई झाल्याने दहशतवाद्यांचा गणेशोत्सवात काही भयानक करण्याचा प्लॅन होता का, हे समोर येणार आहे. मात्र या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यात अतिरेक्यांच्या कारवाया यापूर्वीच उघड झाल्या होत्या. देशविरोधी तत्वांना विदेशातून येणारे कॉल भारतीय गुप्तचर यंत्रणेला समजू न देण्यासाठी हे टेलिफोन एक्सचेंज उभारले गेले होते. पुण्यातील कोंढव्यामध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरु होते. त्याची गोपणीय माहिती एटीएसला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत नौशाद अहमद सिद्धी या 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
कोंढव्यातील मिठानगर येथे असलेल्या एम ए कॉम्प्लेक्स परिसरात अनधिकृत एक्सचेंज सेंटर सुरु होते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सिम कार्ड एटीएसला मिळाले. तसेच सात सिम बॉक्स, वायफाय इतर साहित्य पोलिसांना मिळाले. कोंढव्यात अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. परंतु त्याची माहिती पोलिसांनी मिळाली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोंढवा पोलिसांना या प्रकाराची खबर कशी नव्हती, याबाबत आता उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications