तनिषा भिसेंच्या मृत्यूस दिनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी; रक्तस्त्राव असूनही साडे पाच तास उपचार नाही
Dinanath Mangeshkar Hospital guilty in Tanisha Bhise death case : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी उपचारास नकार दिल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. या प्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने चौकशीसाठी नेमलेल्या समितीने गर्भवतीच्या घरी जाऊन रविवारी तिच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविले. दरम्यान, या प्रकरणी समितीने प्राथमिक अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठविला आहे. यात मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरच याला कारणीभूत असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, अंतिम अहवालाविषयी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सविस्तर माहिती दिली. या अहवालानुसार गर्भवती महिलेच्या मृत्यूला दीनानाथ रुग्णालय प्रशासनच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, याविषयी त्यांनी संपूर्ण थरार देखील स्पष्ट केला.
दरम्यान, चौकशी अहवाल समोर आल्यानंतर व रुग्णालय प्रशासनावर ठपका ठेवल्याचे अहवालात स्पष्ट झाले. त्यानंतर काही वेळातच डॉ. घैसास यांनी त्यांचा रुग्णालय प्रशासनातील पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा या घटनेला काय वेगळे वळन देतोय, ते पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर!
रुपाली चाकणकरांनी आज वैद्यकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आढाव बैठक घेतली. याबाबत त्या म्हणाल्या की, आढावा बैठक घेण्याआधी मी भिसे कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली. कोणताही व्यक्ती किंवा रुग्ण डॉक्टरांशी अनेक गोष्टी शेअर करतात. जेणेकरून डॉक्टरांकडून उत्तम उपचार मिळावेत. 15 मार्च रोजी पहिल्यांदा रुग्ण डॉ. घैसास यांना भेटले होते.
रुग्णाची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री फक्त डॉक्टरांना माहीत होती. परंतु, ही घटना घडल्यानंतर रुग्णालयाने चौकशीसाठी जी अंतर्गत समिती नेमली होती, त्या समितीचा अहवाल दिला त्यात स्वतःला वाचवण्यासाठी जाहीररित्या रुग्णाची गोपनिय माहिती सोशल मीडियावर मांडल्या. ही माहिती गोपनिय ठेवण्याचा नियम आहे. याप्रकरणी आम्ही रुग्णालयाचा निषेध करतो.
अहवालात काय म्हटलं आहे?
ईश्वरी भिसे (तनिषा) या नावाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्या नावाची नोंद आहे. सूर्या रुग्णालय आणि मणिपाल रुग्णालय या ठिकाणी आधार कार्डनुसार नाव मोनाली गणेश रुद्रकर असं आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आधारकार्ड, गॅझेटची खात्री करुन नोंद करणं आवश्यक होतं पण तसं केल्याचं दिसून येत नाही. भिसे या 2020 पासून वेळोवेळी उपचार व सल्ला घेण्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात येत होत्या.
साडेपाच तास ईश्वरी भिसे उपचारांविना
डॉ. घैसास, डॉ. रुचिका कांबळे आणि श्रीमती रसिका सावंत यांनी तपासणी केली आणि तनिषा यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. अर्भक कक्षातील शिल्पा कलानी यांची भेटही करुन देण्यात आली. कमी वजनांची सात महिन्यांची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत आणि कमीत 2 ते अडीच महिने अतिदक्षता विभागात उपचार करावे लागतील हे समजावून सांगण्यात आलं आणि यासाठी 10 ते 20 लाख रुपये खर्च लागेल याची कल्पना देण्यात आली.
तोपर्यंत त्यांना बाह्यरुग्ण विभागातील बेडवर विश्रांती आणि देखभालीसाठी ठेवण्यात आलं होतं. रुग्ण इश्वरी यांच्या नातेवाईकांनी तुम्ही त्यांना दाखल करुन घ्या पैशांच्या व्यवस्थेसाठी प्रयत्न करत आहोत असं सांगितलं. सदरील माता अतिजोखमीची माता होती. तसंच रुग्णालयात आल्यानंतर त्यांचा रक्तदाबही वाढला होता. त्यामुळे रुग्णाला दाखल न करुन घेतलं गेल्याने रुग्ण दुपारी 2.36 च्या सुमारास उपचारांविना निघून गेल्याचं दिसून आलं.
रक्तस्राव होत असतानाही उपचार झाले नाहीत
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, रुग्णालायात 9 वाजून 1 मिनिटांनी रुग्णाची एन्ट्री आहे. रुग्णाला 2 एप्रिलला बोलावलं होतं. पण 28 मार्चला गर्भवती महिलेला रक्तस्राव होऊ लागल्याने त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यानुसार त्यांनी रुग्णालयात येण्यास सांगितलं. संबंधित स्टाफला डिलिव्हरीसाठी तयारी करण्यास सांगितलं. त्यानुसार स्टाफने ऑपरेशनचीही तयारी केली.
रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्याअगोदर त्यांच्याकडून 10 लाखांची मागणी केली. हे सर्व रुग्णासमोरच सुरू होतं. ते तीन लाख रुपये भरायला तयार होते. इतर पैशांची व्यवस्था आम्ही उद्यापर्यंत करू, असंही म्हणाले. मग मंत्रालयातून आणि विभागातून फोन गेले. तरीही याची दखल घेतली नाही. रात्री अडीच वाजता ससून रुग्णालयात नातेवाईकांनी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.
या काळात रुग्णाची मानसिकता खचली होती, त्यामुळे रुग्ण 15 मिनिटांत बाहेर आला. ते रुग्णालयात कोणालाही भेटले नाहीत. तिथून ते सूर्या रुग्णालयात गेले, चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला. खचलेली मानसकिता आणि रक्तस्राव यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.












Click it and Unblock the Notifications