ज्याचे फॉर्म रखडले त्यांना एकदम 4500 रुपये देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
पुणे : लाडकी बहीण योजना कुठेही बंद होणार नाही. ही खटाखट खटाखट नाही तर ही फटाफट फटाफट चालणारी योजना आहे. आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ज्या बहिणींना फॉर्म भरायचे रखडले आहेत, त्या लाडक्या बहीणींना तीन महिन्यांचे एकाचवेळी 4500 रुपये देणार,अशी घोषणाच देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
पुण्याच्या बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पार पडला. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. त्यावेळी ते बोलत होते.

आजचा अतिशय आनंदाचा दिवस आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची औपचारिक सुरुवात पुण्यातून होत आहे. ही सुरुवात पुण्यातून का? असे मला विचारले एकाने विचारलं. पुण्यातूनच आई जिजाऊंनी सोन्याचा नांगर चालवून स्वराज्याची संकल्पना शिवरायांना दिली होती. महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला, त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सांगितले की. महिलांना शिक्षणाचा अधिकार आहे. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा याच पुण्यात सुरू केली. त्यामुळे पुणे हे महत्त्वाचे ठिकाण असल्याचं फडणवीस यांनी सांगितले.
आता 1 कोटी 3 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा
आपले सरकार देना बँक सरकार आहे. याआधीच सरकार लेना बँक सरकार होते. मागच्या काळातील सरकार वसुली करणारे सरकार होतं. आत्ताचे सरकार बहिणींना देणारे सरकार आहे. त्यामुळे आज आपण ठरवले पुण्यापासून सुरुवात करायची. पण पुण्यापासून जरी औपचारिक सुरुवात केली असली तरी मुख्यमंत्र्यांनी सांगितले पैसे क्रेडिट करणे सुरू करा. आता 1 कोटी 3 लाख महिलांना त्यांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये प्रत्येकी जमा झाले आहेत. आता काही महिला बाकी आहेत. पण काळजी करू नका, प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही, हा आमचा निर्धार असल्याचं फडणवीस यांनी सांगितले.
ही फटाफट फटाफट चालणारी योजना आहे
ज्या बहिणींना फॉर्म भरायचे रखडले आहेत तीन महिन्यांचे एकाचवेळी 4500 रुपये देणार आहे. महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्रित पैसे आम्ही टाकणार आहोत. सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्या सर्व लाडक्या बहीणींना एकदम तीन महिन्याचे पैसे मिळणार आहेत. योजना कुठेही बंद होणार नाही. ही खटाखट खटाखट सारखी योजना नाही. ही फटाफट फटाफट चालणारी योजना आहे. आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ज्यावेळेस आम्ही लाडकी बहीण योजनेची घोषणा केली, त्यावेळेस सावत्र भावांच्या पोटात खूप दुखयला लागलं. सावत्र भावांनी खूप प्रयत्न केले.योजना होऊ नये म्हणून पहिल्यांदा न्यायलयात गेले. न्यायलयाने त्यांना नाकारल्यानंतर जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्यावर पुरुषांचे फोटो लावले. जेणेकरून महिलांना नंतर सांगता येईल तुमचे फॉर्म आम्ही सरकारला दिले होते. मात्र, सरकारने ते फॉर्म स्वीकारले नाहीत. काही ठिकाणी तर मोटरसायकलचे फोटो लावले.तर काहींनी गार्डनचे फोटो लावण्यात आले. त्यांच्याकडून जाणीवपूर्वक अशा प्रकारचे फोटो लावून फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजे आणि महिलांपर्यंत पैसे पोहोचू नये,असा प्रयत्न करण्यात आल्याचं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications