वारकरी संप्रदायाला काळीमा फासणारी घटना; आळंदीत तरुणीवर अत्याचार, महिला कीर्तनकारासह 5 जणांवर गुन्हा
Pune Crime News : अध्यात्म आणि भक्तीचे केंद्र असलेल्या आळंदीतून एक धक्कादायक आणि माणुसकीला तथा वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.
आळंदी येथील केळगाव रस्त्यावर असलेल्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत एका तरुणीला डांबून तिच्यावर वारंवार बलात्कार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, एक कीर्तनकार महिला देखील सहभागी असल्याचे समोर आले आहे.
पीडित तरुणीने पाच जणांविरुद्ध बलात्कार, अपहरण, धमकी आणि जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या घटनेमुळे वारकरी शिक्षण संस्थांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सकल मराठा समाजाने आळंदी पोलीस ठाण्यात पत्र देऊन या प्रकरणी कठोर कारवाईचीृ मागणी देखील केली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, २ जून २०२५ रोजी ती घरी एकटी असताना तिच्या ओळखीच्या एका महिलेने तिला शेताकडे जाण्याचे कारण सांगून घराबाहेर नेले. वाटेत, काळ्या रंगाच्या 'इर्टिगा' गाडीतून आलेल्या आण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे आणि एका अनोळखी चालकाने तिचे जबरदस्तीने अपहरण केले. तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता, तिला ॲसिड टाकण्याची धमकी देण्यात आली.
यानंतर, तिला थेट आळंदी येथील एका खासगी मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत नेण्यात आले. तिथे आण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे, कीर्तनकार सुनिता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे यांनी तिला एका खोलीत डांबून ठेवले. फिर्यादीनुसार, या ठिकाणी आण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा गंभीर आरोप आहे, ज्यामुळे समाजात मोठी खळबळ उडाली आहे.
कीर्तनकार महिला व कुटुंबीयांसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या हृदयद्रावक प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत आण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण प्रल्हाद आंधळे, अनोळखी वाहनचालक, सुनिता अभिमन्यू आंधळे आणि अभिमन्यू भगवान आंधळे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींवर या प्रकरणी गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींवर अपहरण, बलात्कार, धमकी देणे, जबरदस्ती आणि गुन्हेगारी कट रचणे यांसारख्या गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारकरी शिक्षण संस्थेत अशा प्रकारची घटना घडल्याने वारकरी संप्रदायाची बदनामी झाली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.
सिगारेट न दिल्याने गुंडांनी दुकान फोडले
दुसरीकडे, पुण्यातून गुन्हेगारीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तमनगर परिसरात सिगारेट न दिल्यामुळे संतापलेल्या काही गुंडांनी हातात कोयते घेऊन एका दुकानावर हल्ला केला. ही संपूर्ण धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही घटनांमुळे समाजातील वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती आणि विशेषतः धार्मिक व शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.












Click it and Unblock the Notifications