कोण आहे गजा मारणे? ज्याच्या टोळीतील सदस्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण केली
Pune Crime News Who is Gaja Marane : कोयता गँग त्यांचे कारनामे, गुंडांच्या भरदिवसा हत्या अशा अनेक गुन्हेगारी कारवायांनी पुणे शहर असुरक्षित बनत आहे, त्यातच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला गजा मारणे टोळीने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर पोलिसांनी ठोस पाऊले उचलत गजा मारणे याच्यावर मकोका लावला आहे.
गजा मारणे हे पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रातील नेहमी चर्चेत राहणारे नाव आहे. गेल्या काही वर्षात पुणे शहर आणि आसपासच्या जमिनींच्या किमतीत वाढ झाल्याने मुंबईतील अनेक बांधकाम कंपन्या आणि बांधकाम व्यावसायिक पुण्यात स्थलांतरित होऊ लागले आहेत. त्यातून जमीन खरेदीवरून टोळ्या तयार होऊ लागल्या आणि पुण्यात गुन्हेगारीकरण वाढत गेले.

कोण आहे गजानन मारणे?
गजा मारणे याने जमीन मालक आणि बिल्डर यांच्यातील दुवा किंवा हस्तक्षेप करणारा व्यक्ती म्हणून काम करायला सरुवात केली. एजंटसारखी त्याने टक्केवारी ठरवली होती. यातून वर्चस्ववाद वाढत गेला आणि नीलेश घायवळ आणि गजानन मारणे यांच्या टोळ्या तयार झाल्या. या टोळ्यांच्या वर्चस्वामुळे खुनाच्या अनेक घटना घडल्या आहेत.
गजा मारणे याला पप्पू गावडे आणि अमोल बधे यांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली होती, त्याच्यावर त्यावेळी विशेष कारवाई करण्यात आली होती. मात्र, पुराव्याअभावी गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांची न्यायालयाने सुटका केली. तुरुंगातून सुटल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे येताना मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत 300 हुन आणि इतर वाहनांचा समावेश होता. या मिरवणुकीमुळे पुन्हा एकदा गजावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस उपायुक्तांनी घेतली शाळा
पुण्यात शरद मोहोळ याचा खून झाल्यानंतर पोलिस दलाने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली. यामध्ये अनेक गुन्हेगारांची शाळाच कार्यालयाच्या आवारात पोलिसांनी भरवली. त्यावेळी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी गजा मारणे याच्यासह सर्वांनाच खाक्या दाखवल्या आणि गुन्हेगारी न करण्यासंदर्भात इशारावजा सूचना दिल्या होत्या.
मंत्री मोहळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण
केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण करण्यात आली होती. मारहाण करणारे संशयित गजा मारणे टोळीशी संबंधित होते. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक पाऊले उचलत गजा मारणे याच्यावरही कारवाई करणार हे स्पष्ट केले होते.
गजा मारणे टोळीतील तिघांवर मकोका
गजानन मारणे याच्या टोळीतील तिघांवर मकोका लावण्यात आला आहे. एकूण 27 जण आमच्या रडारवर असून टोळीप्रमुखावरही कारवाई केली जाईल असा इशाराच पोलिसांनी दिला , यानंतर टोळीतील काही सदस्यांच्या मालमत्ता आणि वाहनाची माहिती मागवण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications