पुण्यात पोलिसांवरील हल्ल्यांची मालिका सुरूच! पिसोळी येथे वाहतूक पोलिसाला 'या' कारणावरुन बेदम मारहाण!
Pune crime news : पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात कोयता गँगची दहशत अन् गुंडांच्या गँगवारनंतर आता खाकी वर्दी सुरक्षित राहिली नाही हे गेल्या काही दिवसांतील घटनांवरुन दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी कोयत्याचा प्राणघातक हल्ला आणि आता अगदी क्षुल्लक कारणावरून भर रस्त्यात पोलिसांना बेदम मारहाण झाली. त्यानंतर आज नोकरीवरुन घरी जाणाऱ्या एका वाहतूक पोलिसाला उंड्री पिसोळी परिसरात चार अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिस वेगाने कामाला लागले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, पुणे पोलिस दलातील पोलीस शिपाई प्रवीण डिंबळे हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. लघुशंकेसाठी थांबल्याच्या कारणावरून त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
नेमकी काय आहे घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय विद्यापीठ वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस शिपाई प्रवीण रमेश डिंबळे हे या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. काल रात्री (रविवार) डिंबळे हे त्यांचे काम संपवून घरी जात होते. उंड्री पिसोळीजवळील कॅनॉलच्या बाजूला, फर्निचरच्या दुकानाजवळ ते लघुशंकेसाठी थांबले होते. त्याचवेळी एका चारचाकी वाहनातून (कार) आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी थांबवली आणि प्रवीण डिंबळे यांना अचानक बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
जखमी पोलिसावर रुग्णालयात उपचार
टवाळखोरांकडून झालेल्या हल्ल्यानंतर पोलिस शिपाई डिंबळे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिस दलाकडून मारहाणकर्त्यांचा शोध सुरु आहे.
पुन्हा पोलिस लक्ष्य!
पुण्यात पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांची ही दुसरी मोठी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच एका पोलीस कर्मचाऱ्यावर कोयत्याने हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता वाहतूक पोलिसाला मारहाण झाल्याने पुणे पोलिसांच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे..
पुणे शहराला खमक्या पोलिस आयुक्त लाभले आहेत, अशातच पोलिसांवरच हल्ले होत असल्याने पोलिसांची सुरक्षा चहाट्यावर आली आहे. जिथे पोलिसांवरच हल्ले होत आहेत, तिथे सामान्य माणसांची सुरक्षेचे काय असे सवाल उपस्थित होत आहे. या घटनेमुळे पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणि पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.












Click it and Unblock the Notifications