चारित्र्याच्या संशयाचे भुत! ज्या पत्नीला नगरसेवक करायचे तिनेच पतीला संपवलं.. पिंपरी चिंचवडमध्ये खून
pune crime news pimpri chinchwad murder wife kills husband : पती-पत्नीच्या पवित्र आणि विश्वासाच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना पिंपरी चिंचवडमध्ये २४ ऑक्टोबर २०२५ च्या पहाटे घडली आहे. ज्या घरातून समाजकार्याची आणि राजकीय महत्त्वाकांक्षाची स्वप्नं पाहिली जात होती, त्याच घरात रागाच्या भरात एका पत्नीने तिच्या पतीची अतिशय निघृणपणे हत्या केली. चारित्र्यांच्या संशयातून ही हत्या करण्यात आली.

कपड्याने गळा आवळुन पतीची हत्या
मीडिया रिपोर्टनुसार, पती नकुल आनंद भोईर यांच्या सततच्या चारित्र्याच्या संशयाला कंटाळून, पत्नी चैताली भोईर हिने कापडाने गळा आवळून त्यांचा जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नकुल आणि चैताली यांच्या ५ आणि २ वर्षांच्या चिमुकल्या मुलांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
चारित्र्य संशयावरून वाद विकोपाला
शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास ३ वाजता नकुल आणि चैताली यांच्यात जोरदार भांडण झाले. नकुलच्या सततच्या संशय घेण्याच्या सवयीमुळे हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात चैतालीने नकुलचा गळा आवळला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने महिला आरोपी चैताली भोईरला ताब्यात घेतले आहे आणि प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
राजकारणात उतरवण्याचे होते नकुलचे स्वप्न
प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, मृत नकुल भोईर हे सामाजिक कार्यात सक्रिय होते आणि त्यांचे काही नेत्यांशी जवळचे संबंध होते. नकुल गेल्या काही महिन्यांपासून आपल्या पत्नीला नगरसेवक बनवण्यास उत्सुक होते. त्यासाठी त्यांनी तयारीही केली होती, राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या धर्तीवर ते तयारीही करत होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत चैतालीला तिकीट मिळावे यासाठी ते प्रयत्नशील होते.
ज्या पत्नीला नगरसेवक करायचे तिने केला खून
एकीकडे पत्नीला राजकीय उंचीवर नेण्याचे स्वप्न पाहणारा नकुल, तर दुसरीकडे त्याच पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असल्याने, या दाम्पत्याच्या नात्यात नेमका काय गुंता होता आणि वाद इतका विकोपाला का गेला, याचा तपास आता पोलीस सखोलपणे करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण भोईर कुटुंबावर गंभीर सावट पसरले आहे.












Click it and Unblock the Notifications