पुण्यात भाजप आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न; मारहाणीची धमकी, नेमकं काय घडलं?
पुण्यात खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सतत त्रास देणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्या घरी घुसण्याचा प्रयत्न करत शिवीगाळ आणि धमकीही दिल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपीला अटक केली आहे.

आरोपी कोण आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव शंकर सर्जेराव धुमाळ (वय ४७) असून त्याच्याविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धुमाळ हा गेल्या काही दिवसांपासून आमदार तापकीर यांच्या घराच्या परिसरात वारंवार येत होता व गोंधळ घालत होता.
काय घडलं नेमकं?
शंकर धुमाळ याने तीन वेळा तापकीर यांच्या धनकवडी येथील निवासस्थानी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी अजित देवघरे यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, धुमाळ याने त्यांच्याशीही उद्धट वर्तन करत शिवीगाळ केली आणि मारहाण करण्याची धमकी दिली.
सुरुवातीला त्याच्यावर सौम्य कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याने पुन्हा-पुन्हा घराजवळ येऊन त्रास देणे सुरूच ठेवले.
पोलिस आयुक्तांकडे तक्रार
या प्रकारामुळे हैराण झालेल्या आमदारांनी थेट पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिसांनी धुमाळ याला अटक करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आमदार तापकीर यांचा राजकीय प्रवास
भीमराव तापकीर हे भारतीय जनता पक्षाचे चार वेळा निवडून आलेले आमदार आहेत. त्यांनी 2001 साली पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. ते दोन वेळा नगरसेवक राहिले असून, 2011 च्या पोटनिवडणुकीपासून सलग 2014, 2019 आणि 2024 मध्ये खडकवासला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली आहे.
ही घटना सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत असून, एका आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई करत आरोपीला अटक केली असली तरी अशा घटनांपासून धडा घेण्याची गरज नाकारता येणार नाही.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता! -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?








Click it and Unblock the Notifications