Accident : डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले; स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा युवक ठार, थरारक घटना!
Pune Junnar DJ Vehicle Accident : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वाढदिवसाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या एका शोभायात्रेला भीषण अपघाताने गालबोट लागले आहे. डीजे वाहनाच्या धडकेत 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जुन्नरमध्ये घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी सदर गाडीचालकावर कारवाई केली जावी, अशी मागणी केली आहे. तर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

नेमके काय घडले?
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जुन्नर शहरात शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत डीजे वाहन, ढोल-ताशा पथक आणि गोफनृत्य पथक सहभागी झाले होते.
याच पथकांमध्ये खामगावजवळील शिवेचीवाडी येथील आदिवासी ठाकर समाजाचे 'मुक्तादेवी तरुण मंडळ' ढोल-ताशा पथक देखील होते.
शोभायात्रा जुन्नर बाजार समितीमधून धान्य बाजाराकडे येत असताना, अचानक उतारावर डीजे वाहन ढोल-ताशा पथकातील लोकांच्या अंगावर आले. वाद्याच्या मोठ्या आवाजामुळे अनेकांना वाहन येत असल्याचे समजले नाही. यामुळे गोंधळ उडाला आणि त्यातच आदित्य सुरेश काळे (वय २१) या तरुणाला डीजे वाहनाने चिरडले.
वाहनाने त्याला काही अंतर फरफटत नेले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात गोविंद काळे, विजय केदारी, सागर केदारी, बाळू काळे आणि किशोर घोगरे हे देखील जखमी झाले आहेत.
हा अपघात इतका भीषण होता की डीजे वाहन पुढे जाऊन बाजार समितीच्या प्रवेशद्वारातील वॉचमनच्या खोलीवर जाऊन आदळले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान आदित्य काळेचा मृत्यू झाला.
आदित्य एकुलता एक मुलगा आणि कुटुंबाचा आधार
या अपघातात मृत्युमुखी पडलेला आदित्य सुरेश काळे हा त्याच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. तो औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता आणि सोबतच स्पर्धा परीक्षांचीही तयारी करत होता.
त्याचे वडील सुरेश काळे हे खामगावचे माजी उपसरपंच असून, त्याची आई आणि वडील दोघेही मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. आदित्यच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या आदिवासी ठाकर समाजबांधवांनी जुन्नर पोलीस ठाण्यात आयोजक आणि डीजे वाहनचालकावर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करत धरणे आंदोलन केले.
पोलिसांचा तपास सुरू
जुन्नर पोलिसांनी याप्रकरणी आयोजक देवराम लांडे, अमोल लांडे, डीजे मालक सौरभ शेखरे आणि चालक नामदेव रोकडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वाहनाचे ब्रेक निकामी झाले होते की चालकाचे नियंत्रण सुटले होते, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
या अपघातामुळे उपस्थित झाले प्रश्न!
- डीजे वाहनावर बंदी असतानाही ते शोभायात्रेत का समाविष्ट केले गेले?
- शोभायात्रेसाठी पोलिसांची परवानगी घेतली होती का?
- या जुन्या वाहनाला आवश्यक परवाने आणि फिटनेस प्रमाणपत्र होते का?












Click it and Unblock the Notifications