मराठा आंदोलक आक्रमक, उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन, दानवे म्हणाले- रमेश केरे भाजपचा माणूस
राज्यात मराठा आंदोलनाचा मुद्दा चांगलाच पेटतांना पाहायला मिळत आहे . शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर आज आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणावर विरोधक भूमिका स्पष्ट करत नाहीत असा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे, त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चाने आंदोलन केले तसेच घोषणाबाजी केली. यावेळी मातोश्री समोर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आग्रही होते. मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सर्व नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करणार
सर्वपक्षीय नेते आमच्याकडे मतांसाठी आले होते. पण आज मराठा समाजाचे कार्यकर्ते त्यांच्या घरी पोहोचल्यावर ठाकरे आम्हाला भेटायला तयार नाहीत. आम्ही शरद पवार, नाना पटोले, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेरही आंदोलन करू, असे मोर्चाचे नेतृत्व करणारे रमेश केरे पाटील म्हणाले.
या संदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत मी काही दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये बोलताना भूमिका स्पष्ट केली होती. आरक्षणाबाबत आम्ही अनेकदा भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मांडण्यात आलेल्या विधेयकालाही आमचा पाठिंबा होता. आमचे म्हणणे इतकेच आहे. आरक्षणाच्याबाबतीत राजकीय नेत्यांच्या भूमिकेपेक्षा, सरकारने सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं आणि सर्वमान्य तोडगा काढावा. मध्यंतरी सरकारने आरक्षणाच्या बाबतीत सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचे नाटक करण्याचा प्रयत्नही केला होता, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
अंबादास दानवेंचा आंदोलकांशी संवाद
या आंदोलनाची माहिती मिळाल्यावर विधान परिषदेचे नेते अंबादास दानवे हे आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा देखील केली. यावेळी दानवे म्हणाले, आमच्या पक्षाने मराठा आरक्षणाला आधीच पाठिंबा दिला आहे, आता हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.
रमेश केरे म्हणजे, भाजपचा माणूस : अंबादास दानवे
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आंदोलनासंदर्भात म्हणाले, वेळ घेऊन रमेश केरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यायला हवे होते. भेटायला काहीच हरकत नाही, पण हा प्रकार चुकीचा आहे. रमेश केरे म्हणजे, भाजपचा माणूस आहे. मंत्रालयाजवळ ते भाजप नेत्यांचे बॅनर लावताना बऱ्याचदा दिसतात. हे सर्व मुद्दाम केले जात आहे. हे रमेश केरे आहेत. मराठा आरक्षणाबाबत सरकारनं भूमिका घ्यावी, त्या भूमिकेला आम्ही पाठिंबा देऊ, असे आम्ही सांगितलेले आहे." असेही दानवे म्हणाले.
ते आंदोलक आमचे नाहीत - जरांगे
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर गेलेली मराठा आंदोलक हे मराठा आंदोलनाशी संबंधित माणसं नाहीत. ते प्रवीण दरेकर यांनी पाठवलेली माणसं आहेत. दरेकर यांनी फडणवीस यांच्याकडून सुपारी घेतली आहे. दरेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय करिअर संपवल्याशिवाय राहणार नाही. याचे परिणाम सरकारला भोगावं लागणार आहे', अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.












Click it and Unblock the Notifications