मराठा पदाधिकारी, कार्यकर्ते आरक्षणासाठी आक्रमक, अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यासमोर आंदोलन
आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलक आक्रमक झाले असून काल उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर आंदोलन केल्यानंतर मराठा आंदोलकानीं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यासमोर आंदोलन केले.
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आंदोलनाचा मुद्दा चांगलाच पेटताना दिसत आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील सातत्याने उपोषण करत आहेत. मात्र मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी ओबीसीचा विरोध आहे.

त्यासाठी मागील काही दिवसांपूर्वी ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी लक्ष्मण हाके यांनीदेखील उपोषण केले होते. मराठा आणि ओबीसी हा संघर्ष आता गावा-गावात पोहोचला आहे. मनोज जरांगे पाटील हे ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका देखील करत आहेत.
महायुती सरकारकडून असे सांगितले जात आहे की, मराठा आरक्षणाबाबत विरोधक म्हणजेच महाविकास आघाडी कडून कोणतीही भूमिका स्पष्ट केली जात नाही. त्यामुळे आता मराठा आंदोलक राजकीय नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा अशी घोषणाबाजी करत आहेत.
30 जुलै रोजी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या वतीने आंदोलन करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर जवाब दो अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आंदोलकांशी संवाद साधला आणि उद्धव ठाकरे आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार असल्याचे सांगितले.
सर्व राजकीय नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करणार
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे आणि यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवार नाना पटोले देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन करून त्यांना काय आहे ही स्पष्ट करावी अशी मागणी करणार आहोत अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलन भास्कर केरे पाटील यांनी मातोश्री बाहेर दिली होती.
त्याच पार्श्वभूमीवर आज 31 जुलै रोजी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यासमोर आंदोलन करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला मंत्री छगन भुजबळ हे विरोध करत आहेत आणि छगन भुजबळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षांमध्ये आहेत,त्यामुळे अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबतची त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी यासाठी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यासमोर आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी देवगिरी बंगल्या बाहेर सुरक्षेमध्ये वाढ देखील करण्यात आली होती. मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या वतीने आंदोलन करण्यात आले आणि 'जवाब दो' अशी नारेबाजी देखील करण्यात आली.
यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या मराठा क्रांती ठोक मोर्चातील काही आंदोलकांना ताब्यात घेतले त्यामध्ये आंदोलक रमेश केरे पाटील यांचा देखील समावेश आहे.












Click it and Unblock the Notifications