राज्यातील प्राथमिक शिक्षक आज एका दिवसाच्या सामूहिक रजा आंदोलनावर, 50 हजार शाळा राहणार बंद
Primary teachers protest : राज्यातील प्राथमिक शिक्षक आज एका दिवसाच्या सामूहिक रजा आंदोलनावर गेले आहेत जवळपास पावणेदोन लाख शिक्षक या आंदोलनात सहभागी होणार असून राज्यभरातील अंदाजे 50 हजार शाळा आज बंद राहतील. राज्यात सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. याला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला आहे.
सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यास राज्याच्या ग्रामीण भागातील राज्यातील 2 लाख विद्यार्थ्यांचे आणि 29 हजाराहून अधिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकारने हे दोन्ही निर्णय रद्द करावेत यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकत्र आल्या आहेत या संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. मात्र कुठलाच ठोस निर्णय शासनाने घेतला नाही. त्यामुळे आज एका दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

कोणत्या मुद्द्यांवरुन शिक्षकांचे आंदोलन?
-अध्यापन सोडून करावी लागणारी प्रशासकीय कामे
-विद्यार्थ्यांना गणवेश न मिळणे
- कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती
- सुधारीत शिक्षक संच मान्यता
अशा विविध मुद्द्यांवर राज्यातील शिक्षक आज आंदोलन करणार आहेत. शिक्षक संघटनातर्फे राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्यातील काही ठिकाणी शाळा बंद राहणार आहेत.
शिक्षण सेवकांना आंदोलनातून सूट
राज्यभरात आज साडे अकरानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. शिक्षण सेवकांना आंदोलनातून सुट दिली आहे. त्यामुळे काही ठिकाणी शाळा सुरू आहेत. परंतु, शिक्षकांच्या या महामोर्चामुळे राज्यातील प्राथमिक शाळा मोठ्या प्रमाणात बंद आहेत. राज्यातील सर्वच शिक्षकांनी आज रजेचा अर्ज केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे दौरे असल्यामुळे पुणे, कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे. परंंतु, इथल्याही सर्व शिक्षकांनी रजेचा अर्ज केला आहे. या तीन जिल्ह्यात पुढील काही दिवसांत मोर्चा काढण्यास परवानगी मिळाल्याची माहिती आहे.












Click it and Unblock the Notifications