लालबागच्या राजाचे दर्शन घेणं म्हणजे पवारांचा ढोंगीपणा, त्यांना हिंदूत्वाबाबत सुबुद्धी मिळो- दरेकर
Pravin Darekar on Sharad Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार यांनी आज नात व जावयांसोबत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यांच्या या दर्शनवारीवर भाजप नेत्याने आक्षेप घेत जोरदार हल्लाबोल चढवला आहे. शरद पवार यांनी लालबागच्या राज्याचे दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा आहे, असा आरोप भाजप नेते तथा आमदार प्रवीण दरेकर यांनी केला.
काय म्हणाले प्रवीण दरेकर?
भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, विधानसभा निवडणूक जवळ आल्याने शरद पवार यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि लालबागचा राजाची आठवण झाली आहे. शरद पवार यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेणे म्हणजे ढोंगीपणा आहे. मध्यंतरी शरद पवार 40 वर्षांच्या खंडानंतर किल्ले रायगडावर गेले होते. ते मुख्यमंत्री होते तेव्हा लालबागचा राजाच्या दर्शनाला आले होते. त्यानंतर आता 30 वर्षांनी ते पुन्हा लालबागचा राजाच्या दर्शनाला आले. माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की, शरद पवार यांना हिंदुत्त्वाबाबत सुबुद्धी मिळो, असे दरेकर म्हणाले.

शरद पवार नात, जावयासोबत मंदिरात
शरद पवार यांनी सोमवारी सकाळी जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यानंतर प्रवीण दरेकर यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, ज्ञानेश्वर महाराव यांनी शरद पवार यांच्यासमोर प्रभू रामचंद्र, विठुराया आणि हिंदुत्त्वाचा अपमान केला. त्यावर काहीही न बोलता शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले. निवडणुकीसाठी नौटंकी का होईना पण लालबागच्या राजाने शरद पवार यांना सुबुद्धी दिली. पण महाराष्ट्राच्या जनतेला ही ढोंगी श्रद्धा दिसून येत आहे, असा टोला त्यांनी लगावला.
शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा आहे.
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) September 9, 2024
एकीकडे ज्ञानेश्वर महाराव यांच्या उपस्थितीत हिंदू देवतांचा अपमान ऐकायचा आणि दुसरीकडे दर्शनासाठी यायचं हे ढोंग आहे. pic.twitter.com/yrIg1gavzV
अमित शहांनीही घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
सकाळी शरद पवार दर्शनाला आले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील लालबागमध्ये उपस्थित होते.त्र, यावेळी अजित पवार हजर नसल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या. पण त्यानंतर दादांनी विमानतळावर जाऊन शहांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले.












Click it and Unblock the Notifications