माजलगाव विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत! जयसिंह सोळंकेंना मविआचे कडवे आव्हान
Prakash Solanke Jaisingh Solanke vs Radhakrishna Hoke : माजलगाव विधानसभा मतदारसंघात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे, तो म्हणजे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्या राजकीय वारशाचा ताज पुतणे जयसिंह सोळंके यांच्या डोक्यावर ठेवण्याचा निर्णय. महिन्याभरापूर्वी प्रकाश सोळंके यांनी जाहीर केले की येणारी विधानसभा निवडणूक ते लढणार नसून त्यांच्या ऐवजी जयसिंह सोळंके हे लढणार आहेत.
मागील 35 वर्षे मला सांभाळले तसेच जयसिंह यांनाही सांभाळण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करून त्यांनी आपला राजकीय वारसा पुतण्याकडे सुपूर्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर प्रकाश सोळंके हे अजित पवार गटासोबत आहेत. महायुतीकडून या मतदारसंघात अजित पवार गटाचा दावा प्रबळ आहे. त्यामुळे जयसिंह सोळंके हे या मतदारसंघातील महायुतीचे संभाव्य उमेदवार असू शकतात. पण, तिकीट मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच अशोक डक यांच्याशी त्यांना स्पर्धा करावी लागणार आहे.

सोळंके कुटुंबीयांचा माजलगाव विधानसभा मतदारसंघावर दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे. दिवंगत सुंदरराव सोळंके यांच्या राजकीय वारशाचा पाया मजबूत ठेवत प्रकाश सोळंके यांनी मतदारसंघात विविध विकासकामे केली. औद्योगिक वसाहत, उपसा जलसिंचन योजना, कुंडलिका जलसिंचन योजना, आणि साखर कारखाना यांच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघावर प्रभावी पकड ठेवली होती.
प्रकाश सोळंके यांनी राज्यमंत्रिपदही भूषवले आहे. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीचा उमेदवार तगडे आव्हान देऊ शकतो, कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांना माजलगाव आतूनच चांगले मतदान झाले होते. त्यामुळे आता या मतदारसंघात महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे.
भाजप आणि राष्ट्रवादीतील स्पर्धा
महायुतीत माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादी किंवा भाजप यापैकी कुणाच्या वाट्याला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपकडून रमेश आडसकर आणि मोहन जगताप इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून जयसिंह सोळंके आणि अशोक डक यांच्यातील तिकीट मिळवण्याची चुरस आहे. अशोक डक हेही अजित पवार समर्थक असून ते मुंबई बाजार समितीचे सभापती आहेत.
महाविकास आघाडीचे काय?
महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, नारायण डक, गंगाभीषण थावरे, डॉ. सुरेश साबळे, आणि डॉ. अशोक थोरात हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.
मनोज जरांगे यांची भूमिका महत्त्वाची
विधानसभा निवडणुकीतही मनोज जरांगे पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. बीड जिल्हा हा जरांगे यांचा जिल्हा आहे. त्यांनी या जिल्ह्यात मतदारसंघवार घोंगडी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे, त्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता, विधानसभेतही जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरेल. कारण या मतदारसंघात मराठा समाजाची मते निर्णायक आहेत. त्यापाठोपाठ वंजारी समाजाची मतेही विजयासाठी आवश्यक आहेत.
गतवेळेचा निकाल
माजलगाव विधासभा निवडणुकीत 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके यांनी 12 हजार 890 मतांच्या फरकाने भाजपचे रमेश आडसकर यांचा पराभव केला होता. त्यावेळी ते शरद पवार यांच्या पक्षात होते.












Click it and Unblock the Notifications