ओबीसी आरक्षणाला 100 टक्के धोका, कुणबी मराठा खरे ओबीसी नाहीत- प्रकाश आंबेडकर
यवतमाळ : राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवं म्हणून सरकार विरोधात लढा देत आहेत. तर ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून प्रा. लक्ष्मण हाके यांनी ही आंदोलन केलं होतं.
आता आरक्षणाच्या प्रश्नावर वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाला 100 टक्के धोका असल्याचं विधान केलं आहे. ते यवतमाळ येथे आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्त आयोजित सभेत बोलत होते.

विधिमंडळात फक्त 11 ओबीसी आमदार
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कुणबी हे खरे ओबीसी नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा. विधिमंडळात 190 कुणबी मराठा आमदार आहेत.यामध्ये फक्त 11 ओबीसी आमदार आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला 100 टक्के धोका आहे, असं वक्तव्य आंबेडकर यांनी केलं आहे.
ओबीसीच्या आरक्षणाला 100 टक्के धोका
"कुणबी हा स्वत:ला ओबीसी म्हणत असला तरी तो सभागृहात मी मराठ्यांसोबत आहे, असे सांगतो. तो धनगरांसोबत नाही, तो माळ्यांसोबत नाही, तो वंजारी, लिंगायत, बंजारा यांच्यासोबत नाही. तो तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सोनार यांच्यासोबत तर अजिबातच नाही, म्हणूनच मी सावध राहा असे सांगत आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे. हा धोका 100 टक्के आहे. निवडणुकीनंतर हा धोका निर्माण होईल. माझ्या आधीच्या वक्त्याने सांगितलं की ओबीसींची जातगणना झाली पाहिजे. ही जनगणना झाली पाहिजे," अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.
एकाही कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका
आगामी विधानसभा निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते आज आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने वाशिमच्या पोहरादेवी येथे पोहोचले आहेत.आयोजित ते सभेत बोलत होते.
विधानसभेत ठरावाच्या वेळी कुणबी समाजाची पाटीलकी जागी झाली तर ते आपल्या बाजूने मतदान करणार नाहीत. त्यामुळे यापुढे ओबीसींनी कुणबी सोडून इतर ओबीसी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे. कारण इथला कुणबी मराठा डबल भूमिका घेतो. आपल्यामध्ये बसला की स्वत:ला ओबीसी म्हणवतो आणि पाटलांमध्ये बसला की मराठा म्हणतो. त्यामुळे या निवडणुकीत खूणगाठ बांधा मी ओबीसीलाच मतदान करणार, असं प्रकाश आंबेडकरांनी यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications