PMC Election Result: रवींद्र धंगेकरांना मोठा झटका; पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव, मुलाचं काय?
पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (PMC Election 2026) आज जाहीर झालेल्या निकालांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत धक्कादायक ठरला असून, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, एका गुन्हेगारी प्रकरणात तुरुंगात असलेल्या उमेदवाराने धंगेकर यांच्या पत्नीला पराभूत केल्याने पुण्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे.

तुरुंगातून लढणाऱ्या उमेदवाराने दिला धंगेकरांना धक्का
प्रभाग क्रमांक २३ मध्ये सर्वांचे लक्ष लागून होते. येथे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर महाविकास आघाडीतर्फे रिंगणात होत्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार सोनाली आंदेकर यांनी आव्हान उभे केले होते. सोनाली आंदेकर या सध्या एका हत्या प्रकरणात तुरुंगात आहेत. मात्र, तुरुंगात असतानाही आंदेकर यांनी मिळवलेला विजय प्रतिभा धंगेकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. धंगेकरांच्या बालेकिल्ल्यातच त्यांच्या पत्नीचा पराभव झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
प्रणव धंगेकर आणि गणेश बिडकर यांच्यात काट्याची टक्कर
धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांनी प्रभाग क्रमांक २४ मधून पहिल्यांदाच निवडणूक लढवली. त्यांच्यासमोर भारतीय जनता पक्षाचे अनुभवी नेते गणेश बिडकर यांचे तगडे आव्हान होते. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच या प्रभागात दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. प्रणव धंगेकर यांनी बिडकरांना कडवी झुंज दिली असली तरी, अनुभवी नेत्यासमोर नवख्या उमेदवाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या प्रभागातील अधिकृत अंतिम आकड्यांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
घराणेशाहीची चर्चा आणि निकालाचा परिणाम
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रवींद्र धंगेकर यांनी स्वतःच्या कुटुंबातील दोन सदस्यांना उमेदवारी दिल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी होती. घराणेशाहीच्या या मुद्द्याचा फटका बसला की मतदारांनी बदल स्वीकारला, यावर आता चर्चा रंगू लागली आहे. पुणे महानगरपालिकेच्या या निकालांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या गणितांमध्येही मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दुसरीकडे तुरुंगातील उमेदवाराने धंगेकरांच्या पत्नीचा पराभव केल्याने आता गुंड महापालिकेत दिसतील का? असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.












Click it and Unblock the Notifications