पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा ऐनवेळी रद्द, 'या'मुळे घ्यावा लागला निर्णय
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आज सायंकाळी पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडणार होती याची जोरदार तयारी देखील झाली, पण ऐनवेळी हा मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी झालेल्या पावसामुळे सभास्थळी चिखल झाला आहे, तसेच आज पुणे शहराला पावसाचा ऑरेंज अलर्ट तर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे, त्यामुळे दुपारी पाउस झाल्यास सभेचा विचका होऊ शकतो हे लक्षात घेऊन आयोजकांकडून आधीच पर्यायी ठिकाणाची चाचपणी सुरु झाली होती. पण हा पावसामुळे दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गुरुवारी पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार होते. हा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर स.प महाविद्यालयाच्या मैदानात पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडणार होती. मात्र, कालपासून पुण्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदी यांच्या या सभेवर पाणी फेरले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.

पुण्यात बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे स.प.महाविद्यालयाच्या मैदानात मोठ्याप्रमाणावर चिखल झाला आहे. सततच्या पावसामुळे सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात सर्वत्र ओले झाले आहे. ज्या मार्गाने मोदी स्टेजवर जाणार आहे. त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला. पुण्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता त्यामुळे पुण्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो. याचा परिणाम पीएम मोदींच्या सभेवर झाला असता.
PM Narendra Modi's visit to Pune, Maharashtra cancelled due to the heavy rain situation in the city.
— ANI (@ANI) September 26, 2024
(File photo) pic.twitter.com/VJlrBepmzM
या पार्श्वभूमीवर कालपासूनच आयोजकांनी सभेसाठी दुस-या ठिकाणाची चाचपणी सुरु केली होती. आज पुण्यात मुसळधार पाऊस सुरु राहिल्यास स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पुन्हा पाणी साचून जास्त चिखल होणार हे निश्चित होते असे झाले तर पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच या सभागृहात पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडू शकते. या सभागृहाची आसनक्षमता जास्त आहे. त्यामुळे वेळ पडल्यास या ठिकाणी सभा घेतली जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात होत पण पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द झाला आहे.
शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
हवामान खात्याने मुंबई व पुण्यासह अनेक शहरांत वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा व काॅलेजसना गुरुवार 26 सप्टेंबर २०२४ रोजी सुट्टी देण्यात आली आहे. याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली माहिती दिली आहे.












Click it and Unblock the Notifications