70 वर्षांत जे झालं नाही ते 10 वर्षात केलं! PM मोदी, म्हणाले - 2 वर्षांत 11 लाख लखपती दिदी बनल्या!
PM Narendra Modi on Lakhpati Didi Scheme : 70 वर्षांत जे झालं नाही ते 10 वर्षात आमच्या सरकारनं केलं! असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडलं. 2 महिन्यात 11 लाख लखपती दिदी बनल्या असून महाराष्ट्रातही एक लाख नवीन लखपती दिदी तयार झाल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जळगाव इथं लखपती दिदी योजनेचं उद्घाटन झालं. त्यानंतर ते उपस्थित महिलांना मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारनं खूप मेहनत घेतल्याचं नमूद केलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचं कौतूक केलं.

बचत गटांना 5000 कोटींचे कर्ज दिले
भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक ताकद बनत आहे, मागील काही वर्षांपासून हे साध्य होत आहे. महिलांना मदत मिळेल याची गॅरंटी घेणारा आधी कुणी नव्हता पण आता आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही महिलांचं उत्थान करत आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच पंतप्रधान मोदींनी स्वयं-सहायता गटांना सुमारे पाच हजार कोटींचे फिरते निधी आणि कर्ज जारी केले.
काँग्रेसवर टीका
पीएम नरेंद्र मोदी म्हणाले, एका तराजूत सात दशकं आणि दुसऱ्या तराजूत दहा वर्ष एवढं काम आम्ही केलं आझादीनंतर कोणत्याही सरकारनं केलं नाही. हे माझं आव्हान आहे, तीन कोटी घरं बांधली त्यात महिलांच्या नावावर घर केलं. जनधन खाते उघडले. सर्वात जास्त महिलांचे खाते सुरु केले.
महिलांसाठी अर्थसंकल्पात 3 लाख कोटींची तरतूद
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आधुनिक शेती करण्यासाठी आम्ही महिलांंना ड्रोन देत आहोत. त्याशिवाय कृषी सखी कार्यक्रम सुरु केला आहे. या सर्व अभियानातून मुली, महिलांना रोजगार मिळेल. त्या कमवत्या झाल्या तर समाजात त्यांच्याप्रती दृष्टीकोन बदलेल. येत्या अर्थसंकल्पात महिलांसाठी तीन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकेकाळी महिला, मुलींवर बंधन होती पण आमचे सरकार त्यांच्या विकासासाठी आणि स्वातंत्र्यासाठी झटत आहे. त्यांच्या हाती बळ देत आहे.
महिलांचा राजकारणात सहभाग वाढवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, फायटर पायलट, पोलिस दलातही मुलींची संख्येत वाढ होत आहे. कृषी, डेअरी क्षेत्रापासून स्टार्टअपपर्यंत त्यांचा सहभाग वाढत आहे. राजकारणात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी नारीशक्ती बंधन कायदा तयार केला असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
संबोधनापुर्वी लखपती दिदींशी पीएम मोदींचा संवाद
कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी लाभार्थी महिलांसोबत योजनेबाबत चर्चाही केली. सुमारे 11 लाख लखपती दीदींना ते प्रमाणपत्रांचे वाटपही करणार आहेत. लखपती दीदी योजनेंतर्गत आतापर्यंत एक कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत. तर 3 कोटी लखपती दीदी तयार करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
महाराष्ट्रानंतर पंतप्रधान राजस्थानला जाणार आहेत. जिथे ते जोधपूरमध्ये राजस्थान उच्च न्यायालयाच्या प्लॅटिनम ज्युबिली सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. येथे मोदी उच्च न्यायालयाच्या संग्रहालयाचे उद्घाटन करतील.












Click it and Unblock the Notifications