परळीत धनंजय मुंडेंना शरद पवारांचे शिलेदार राजेसाहेब देशमुख यांचे कडवे आव्हान! कुणाचा विजय होणार?
परळी : पूर्वीचा रेणापूर मतदारसंघ आता परळी झाला. 1997 पासून आतापर्यंत सात वेळा या मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी झाला. त्यात पाच वेळा स्वत: गोपीनाथ मुंडे, दोनदा त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांनी येथे कमळ फुलवलं. गेल्यावेळी पंकजा मुंडे यांचा 35 हजार मतांनी पराभव करत, राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे विजयी झाले. यंदाही धनंजय मुंडेंनाच येथून लढायचंय. मात्र यावेळी स्थिती जरा बदललीय. धनंजय मुंडे व पंकजा मुंडे एकत्र असूनही, शरद पवारांचं येथे जरा विशेष लक्ष आहे. कारण या मतदारसघात शरद पवारांनी राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीत धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत गेल्यामुळे शरद पवारांना या मतदारसंघात बदल करायचाय. या मतदारसंघात धनंजय मुंडेंचा पराभव करण्यासाठी शऱद पवार नक्कीच डाव टाकतील, असे दिसत आहे. महायुतीत ही जागा धनंजय मुंडे म्हणजे अजित पवार गटासाठी सोडला असून येथे त्यांनी तगडा उमेदवार दिला आहे. भाजपच्या पंकजा मुंडे सोबत असल्याने येथे धनंजय मुंडे यांचेच पारडे सध्या जड आहे.

धनंजय मुंडेंना फाईट देणार राजेसाहेब देशमुख
शरद पवार गटाकडून सुदामती गुट्टे, अँड. माधव जाधव, राजेभाऊ फड, बबन गित्ते हे येथून इच्छुक होते पण धनंजय मुंडे यांचे प्राबल्य पाहता त्यांच्या तोडीस तोड फाईट देणारा नेता राजेसाहेब देशमुख हे आहेत आणि त्यांनाच उमेदवारी मिळाली आहे आता निकालाच्या दिवशी काय होते ते बघूया.
जरांगे फॅक्टरचा बसणार फटका ?
लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात मराठा-ओबीसी वादाचा मुद्दा प्रकर्षाने जाणवला. परळीत विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा नक्कीच जाणवेल. मनोज जरांगे कुणामागे ताकद उभी करतात, ते पहावे लागेल. शिवाय मुंडेंच्या विरोधात मराठा- मुस्लिम व दलीत मतांचे विभाजन करणारा नेता शोधण्याचे काम शरद पवार करु शकतात अशीही शक्यता आहे.
या मतदारसंघात मराठा समाजाने एकशिक्का मतदान दिले तर लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र धनंजय मुंडेंच्या परळीत असा बदल होण्याची शक्यता कमीच वाटते. कारण लोकसभेला याच मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना 74,834 मतांची आघाडी मिळाली होती.
विकासकामांच्या मुद्द्यांवर जाईल निवडणूक
धनंजय मुंडे यांच्या काळात पाणी, रस्ते आणि मंदीरे यांचे प्रश्न मार्गी लागल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. परळी शहरापेक्षा परळी तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता मुंडे घराण्याच्या मागे मोठ्या प्रमाणात दिसते. शहरात अंतर्गत गटारी, एसटी स्टॅन्ड, सरकारी रुग्णालयातील गैरसोय आदी प्रश्नांवर नाराजी जाणवते. असे असले तरी, मुंडे यांच्या कामावर बहुतांश जनता सध्यातरी समाधानी असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक मुंडे यांना सोप्पी असल्याचे जाणवते.












Click it and Unblock the Notifications