जिल्हा हादरला ! चालत्या बसमध्ये बाळाला दिला जन्म नंतर बसमधून फेकलं बाहेर, कारण काय?
परभणी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका १९ वर्षीय महिलेने चालत्या स्लीपर बसमध्ये बाळाला जन्म दिल्यानंतर, नवजात बाळाला बसच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले. महिलेचा पती असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने तिला या कृत्यासाठी मदत केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधून रस्त्यावर फेकल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाला.

ही हृदयद्रावक घटना काल सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पाथरी-सेलू रस्त्यावर घडली. सुरुवातीला आरोपी जोडप्याने बसचालकाला सांगितले की, महिलेला उलट्या झाल्या होत्या, त्यामुळे तिने खिडकीतून उलटी केली. मात्र, एका दुचाकीस्वाराने बसमधून कापडात गुंडाळलेले बाळ बाहेर फेकले जात असल्याचे पाहिले आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
नेमके काय घडले?
रितिका ढेरे नावाची महिला अल्ताफ शेख (जो स्वतःला तिचा पती म्हणवत होता) सोबत पुणे येथून परभणीला संत प्रयाग ट्रॅव्हल्सच्या स्लीपर बसने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान, गर्भवती रितिकाला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र, या जोडप्याने बाळाला कापडात गुंडाळून बसच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले. बस चालकाला खिडकीतून काहीतरी फेकल्याचे दिसले. त्याने विचारणा केली असता, आरोपीने सांगितले की पत्नीला बस प्रवासामुळे मळमळ होत असल्याने उलट्या झाल्या होत्या.
दरम्यान, रस्त्यावरुन जाणाऱ्या एका नागरिकाने बसच्या खिडकीतून एक वस्तू फेकली जात असल्याचे पाहिले. जवळ जाऊन पाहिले असता ते एक नवजात बाळ असल्याचे पाहून तो थक्क झाला. त्याने तात्काळ पोलीस हेल्पलाइन १२२ वर फोन करून तक्रार दिली.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांच्या गस्ती पथकाने स्लीपर बसचा पाठलाग करून जोडप्याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीदरम्यान, या जोडप्याने सांगितले की, बाळाचा सांभाळ करणे शक्य नसल्यामुळे त्यांनी हे कृत्य केले. रितिका ढेरे आणि अल्ताफ शेख हे दोघेही परभणीचे रहिवासी असून गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात राहत होते. त्यांनी पती-पत्नी असल्याचे सांगितले, परंतु या दाव्याच्या समर्थनार्थ कोणतीही कागदपत्रे सादर करू शकले नाहीत.
दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी परभणीतील पाथरी पोलीस ठाण्यात या जोडप्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ९४ (३), (५) (शरीराची गुप्त विल्हेवाट लावून जन्म लपवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींना नोटीस बजावण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications