मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी - पंकजा मुंडे
छत्रपती संभाजीनगर : पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत आमदारकीची शपथ घेतल्यानंतर त्या आज बीड दौ-यावर आहेत. भगवान गडावरून मुंडे यांचा दौरा सुरू होणार आहे,त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी पंकजा यांना शरद पवार यांच्या मराठा आरक्षण भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
शरद पवारांची भूमिका काय याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे, राज्यात सध्या मराठा आरक्षणाविषयी सुरू असलेल्या परिस्थितीविषयी शरद पवारांना काय वाटते ते त्यांनी मांडले पाहीजे. पवारांनी त्यांची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करायला हवी.पवारांची आरक्षणाविषयी भूमिका काय आहे, याबद्द्ल महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत, त्यांचा प्रदिर्घ अनुभव पाहता त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

जरांगे यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया
दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना इशारा देत मागण्या मान्य न झाल्यास येत्या विधानसभेत 288 उमेदवार उभे करणार किंवा पाडणार असा इशारा दिला आहे. यावरून त्या म्हणाल्या, कोणीही व्यक्ती काहीही बोलेल. जो पर्यंत एखादी गोष्ट करत नाही, तोपर्यंत त्यात काही तथ्य नाही. बोलायला आपण काहीही बोलू शकतो, पण ते करणे ते महत्त्वाचे आहे. ते करतील तेव्हा मी यावर प्रतिक्रिया देईल,असे पंकजा म्हणाल्या.
राज्यातील वंचितांसाठी योग्य भूमिका घेणार
आमदारकीची शपथ घेण्याबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या,जेव्हा शक्ती होती,सत्ता होती,तेव्हा मी ऐतिहासिक काम करू शकले हे माझे भाग्य आहे. 100 टक्के बीड जिल्हा माझी मातृभूमी, कर्मभूमी आहे. विधान परिषद सदस्य राज्याचा प्रतिनिधी असतो. त्यामुळे राज्यातील वंचितांसाठी योग्य भूमिका घ्यायला अजिबात मी कचरणार नाही.












Click it and Unblock the Notifications