Pankaja Munde Biography :खडतर संघर्षानंतर अखेर पंकजा मुंडे पुन्हा बनल्या मंत्री, कोणते खाते मिळणार?
Pankaja Munde Biography : वडिलांसारख्याच आपल्या अमोघ भाषणशैलीने प्रसिद्ध असलेल्या पंकजा मुंडे यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून त्या भाजपच्या अत्यंत महत्वाच्या नेत्या आहेत. महाराष्ट्र भाजपनेच नाही तर, थेट केंद्रीय भाजपनेही त्यांच्यावर अनेकदा मोठी जबाबदारी दिली आहे. यावेळी पुन्हा त्यांना भाजपने मंत्रीमंडळात स्थान दिले.
मुंडे कुटुंबाचे राजकीय वजन
पंकजा मुंडे यांचा जन्म 26 जुलै 1979 रोजी झाला. गोपीनाथ मुंडे यांना पंकजा, प्रीतम, मुंडे आणि यशशरी या तीन मुली. पंकजा व प्रितम या दोघीही राजकारणात आहेत. पंकजा मुंडे यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर एमबीए देखील पुर्ण केले आहे. पंकजासह प्रीतम व चुलत भाऊ धनंजय मुंडे हे सर्व मुंडे कुटुंबिय सध्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करुन आहेत. याच पंकजा मुंडे यांना पुन्हा भाजपकडून मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.

यापूर्वीही सांभाळले मंत्रीपद
पंकजा मुंडे या 2009 मध्ये परळी मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी 31 ऑक्टोबर 2014 रोजी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना ग्रामीण विकास, महिला आणि बालकल्याण मंत्रालय देण्यात आले होते. साखर कारखाना आणि बँकिंग व्यावसायिक महिला म्हणूनही त्यांची ओळख आहे. 2017 मध्ये पंकजा मुंडे यांना 'द पॉवरफुल पॉलिटिशियन' हा पुरस्कारही मिळाला आहे. तत्पूर्वी 2012 मध्ये पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून काम केले आहे.
लोकसभेला झाला होता पराभव
नुकत्याच झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) बजरंग मनोहर सोनवणे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर भाजपने त्यांच्यावरील विश्वास कायम ठेवत 12 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत त्यांना पुन्हा संधी देत आमदार केले. सध्या पंकजा मुंडे यांच्याकडे भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेशचे प्रभारी पद देखील आहे.
विधानसभा निवडणुकीत होती मोठी जबाबदारी
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव प्रभारी यांनी पंकजा मुंडेंवर मोठी जबाबदारी दिली होती. भाजपच्या महत्त्वाच्या 80 जागांवर ओबीसी समाजाचा पाठिंबा मिळविण्यासाठी पंकजा मुंडे यांचा चेहरा पुढे केला होता. पंकजांनीही त्यासाठी कठोर परिश्रम घेतले. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सर्व ओबीसी पट्यांमध्ये पंकजा मुंडे यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी त्यांना चार दिवस हेलिकाँप्टरही दिले होते. एका दिवसांत 16-17 सभा घेण्याचे रेकाँर्डही त्यांच्या नावावर या काळात झाले.
यापूर्वी झाले होते आरोप
काँग्रेसने जून 2015 मध्ये पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप केला होता. निविदा न काढता खरेदी करून नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यावेळी पंकजा मुंडेंवर झाला होता. त्यावेळी ऑनलाइन टेंडरिंग पद्धतीचे धोरण अस्तित्वात नसल्याचा युक्तिवाद करत तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचा बचाव केला होता. याच पंकजा मुंडेंना आता पुन्हा भाजपकडून मंत्रीपद मिळाले आहे.












Click it and Unblock the Notifications