भाजपच्या बड्या नेत्यांची 'घेराबंदी' निष्फळ; पाचोरा-भडगावमध्ये आमदार किशोर पाटलांचा 'वन मॅन शो'
Pachora Bhadgaon Municipal Election Result | राज्याचे लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि भडगाव नगरपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार किशोर पाटील यांनी भाजपच्या तगड्या आव्हानाला धूळ चारत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. पाचोरा येथे किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांनी विजय मिळवला आहे, तर भडगावमध्येही शिवसेनेच्या रेखा मालचे यांनी बाजी मारली आहे.

भाजपचे दिग्गज नेते आणि संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन यांच्यासह अनेक नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, या सर्व शक्यतांना किशोर पाटील (MlA Kishor Patil) यांनी केराची टोपली दाखवत दोन्ही नगरपालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकवला आहे.
बड्या नेत्यांची फौज विरोधात, पण पाटील ठरले सरस
या निवडणुकीत किशोर पाटील यांच्यासमोर केवळ उमेदवार नव्हते, तर नेत्यांची मोठी फौज मैदानात होती. भाजपचे ताकदवान मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार दिलीप वाघ, अमोल शिंदे आणि किशोर पाटील यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी या सर्वांनी पाटलांच्या विरोधात कंबर कसली होती.
पाचोरा येथे भाजपने माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता वाघ यांना रिंगणात उतरवले होते. ही लढत किशोर पाटील यांच्यासाठी राजकीय अस्तित्वाची लढाई मानली जात होती. मात्र, मतदारांनी किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे.
'स्वबळा'चा नारा यशस्वी
किशोर पाटील यांनी सुरुवातीपासूनच ही निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. महायुतीत असूनही स्थानिक पातळीवर त्यांनी भाजपला दिलेले हे आव्हान धाडसी मानले जात होते. भाजपची संपूर्ण यंत्रणा आणि दिग्गज नेत्यांचा ताफा विरोधात असतानाही पाटलांनी ज्या पद्धतीने रणनीती आखली, त्याचे फळ आज निकालातून दिसून आले आहे.
राजकीय पदोन्नतीची शक्यता
भडगाव आणि पाचोरा या दोन्ही नगरपालिकांच्या निकालाने किशोर पाटील यांचे जिल्ह्यातील वजन प्रचंड वाढले आहे. केवळ स्थानिक स्तरावरच नव्हे, तर राज्य पातळीवरही त्यांच्या या विजयाची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात आणि बड्या नेत्यांच्या विरोधात मिळवलेल्या या विजयामुळे किशोर पाटील यांच्या राजकीय पदोन्नतीची (Promotion) दाट शक्यता वर्तवली जात आहे.
थोडक्यात निकाल
पाचोरा नगरपरिषद: सुनीता किशोर पाटील (शिवसेना) विजयी.
भडगाव नगरपरिषद: रेखा मालचे (शिवसेना) विजयी.
पराभूत उमेदवार: सुचेता वाघ (भाजप) व इतर.
या विजयानंतर पाचोरा आणि भडगावमध्ये शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केला आहे. किशोर पाटील यांच्या नेतृत्त्वात झालेल्या या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.












Click it and Unblock the Notifications