Laxman Hake : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी केली अटक; वाचा-नेमकं काय आहे प्रकरण
ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांना पंढरपूर पोलिसांनी अटक केली आहे. धनादेश अनादर प्रकरणी ही झाल्याची माहिती देण्यात आली. या प्रकरणात त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले आहे. यामुळे आता हाकेंच्या अडचणी वाढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, या प्रकरणी त्यांना तातडीने जिल्हा सत्र न्यायालयापुढे हजर केले असता कोर्टाने त्यांची जामिनावर सुटका केली. यासंबंधीच्या माहितीनुसार, लक्ष्मण हाके यांची विजया infra कंपनी आहे.
या कंपनीने सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन कंपनीस 2021 साली 3 लाख रुपयांचा धनादेश दिलेला होता. तो बाऊन्स झाल्यानंतर सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन कंपनी ने ( केस नंबर stc 391/2021) लक्ष्मण हाके यांच्या विरोधात तक्रार केली होती.
या प्रकरणी कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते. त्यानुसार पोलिसांनी आज लक्ष्मण हाके यांना अटक करून पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. त्यानंतर झालेल्या संक्षिप्त सुनावणीत न्यायालयाने हाके यांची जामिनावर सुटका केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
2019 मध्ये लढवली विधानसभा
लक्ष्मण हाके यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव झाला. शिवसेनेकडून शहाजीबापू पाटील यांनी देशमुखांना पराभूत केले. आता आगामी निवडणुकीत लक्ष्मण हाके शहाजीबापू पाटलांना टफ फाइट देण्याची शक्यता आहे.

2022 मध्ये शिवसेनेत प्रवेश
3 ऑगस्ट 2022 मध्ये लक्ष्मण हाके यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले. यानंतर त्यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा समाचार घेत त्यांनी म्हटले म्हणून शिवसेना संपली असे होत नाही, असे म्हटले होते. तर शिवसेनेत गेल्यानंतर आपल्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते. अठरा पगड जातींसाठी शिवसेना काम करते, असे म्हणत सत्तेसाठी अनेकांनी शिवसेनेत फुट पाडली. मात्र आमच्या सारखे हजारो होतकरु शिवसेनेत प्रवेश करु आणि शिवसेना वाचवू असे म्हटले होते.
माढ्यातून भरला होता अर्ज
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात बंडखोरी करून माढा लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत जिल्हाधिकारी कार्यालयात अवतरले.
नेमके कोण आहेत लक्ष्मण हाके?
लक्ष्मण हाके हे आपल्या अनोख्या आंदोलनामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी ओबीसी संघर्ष सेनेचे अध्यक्ष, ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे कार्याध्यक्षपदावर काम केले आहे. तर मागील काही वर्षात अनेक ओबीसी मोर्चे आंदोलनात सक्रिय सहभागी असल्याचे दिसून आले आहे. यात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोतराजच्या वेशात जाऊन लक्षवेधी आंदोलन केले होते. तर माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी महात्मा फुलेंसारखी वेशभुषा करत त्यांच्यासारखे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते. लक्ष्मण हाके हे सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात काही दिवस अध्यापनाचे कामही त्यांनी केले आहे.












Click it and Unblock the Notifications