धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धसांनी देवस्थानांच्या जमिनी हडपल्या; ओबीसी नेत्याचा आरोप
OBC leader Laxman Hake attack on Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा सभागृहासोबतच बाहेर माध्यमांमध्ये सातत्याने लावून धरला. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. तर वाल्मिक कराड यांचा आका हे धनंजय मुंडे असल्याने त्यांचा थेट या खून प्रकरणाशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले आहे. अशातच आता भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर देखील ओबीसी नेत्यांनी निशाणा साधला आहे. सुरेश धसांनी देवस्थानांच्या जमिनी हडपल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
भाजप आमदार सुरेश सुरेश धसांनी महाराष्ट्रात देवस्थानांच्या जमिनी हडपल्यात. भाजप ज्या प्रभू रामचंद्राच्या नावावर राजकारण करते त्याच प्रभू रामचंद्राच्या नावावरील उतारे धस यांनी स्वत:च्या नावावर केलेत, असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

धस भाजपच्या विचारधारेत बसतात का?
लक्ष्मण हाके म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुरेश धस भाजपच्या विचारधारेत कुठे बसतात हे चेक करून घेतले पाहिजे. नाहीतर तुमच्या गळ्यातील हाडूक तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे, असा खोचक इशाराच त्यांनी यावेळी बोलताना दिला.
संभाजीनगरातील क्रांती चौकात आंदोलन
लक्ष्मण हाके यांनी पुढे बोलताना सांगितले की, सुरेश धस यांच्याविरोधात ते आंदोलन करणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या क्रांतीचौकात बुधवारी आंदोलन करण्यासाठी लक्ष्मण हाके आले होते. त्यापूर्वीच त्यांनी हे आरोप केलेत. ओबीसी समाजाचे आंदोलन हे मोर्चांच्या विरोधात नाही, तर मराठवाड्यातील सामाजिक स्वास्थ बिघडले जात असून लोक असुरक्षित होत आहेत. याविरोधात आम्ही हे आंदोलन करत आहोत, असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
नेता होण्याचे डोहाळे
लक्ष्मण हाके म्हणाले की, सुरेश धस यांना बीड जिल्ह्याचे नेता होण्याचे डोहाळे लागले आहेत. त्यांना वाटते बीड जिल्हा माझाच आहे. उद्या त्यांना महाराष्ट्राचे नेतृत्व होण्याचे डोहाळे लागू शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी सांगू शकतो की तुमचा पक्ष काही धोरणावर, तत्चावर प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन तुम्ही देशभर राजकारण करता आहात. परंतू त्याच प्रभू रामचंद्राच्या नावावरचा उतारा सुरेश धस यांनी चोरला आहे. शंभू महादेवाच्या देवस्थानाचा उतारा चोराला आहे, तोही मंत्री असताना.
धसांना चौकशीसाठी बोलवा
लक्ष्मण हाके म्हणाले की, सुरेश धस यांना वाल्मिक कराड प्रकरण, संतोष देशमुख हत्येची जर इतकी माहिती आहे तर त्यांना चौकशीसाठी बोलावून घ्या. त्यांच्याकडून सर्व माहिती घ्या. त्यांचे जवाब रेकॉर्डवर घ्या, अशी मागणीही त्यांंनी केली.
धस आणि जरांगेमध्ये कोल्ड वॉर
लक्ष्मण हाके म्हणाले की, सुरेश धस आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू आहे. त्यामुळेच कोणाच्या घरात घुसण्याची भाषा केली जातेय. विजयानंतरही स्वपक्षावर टीका करणारा आमदार कसा असू शकतो? त्यांच्या मनात जातीविषयी तेढ आहे. त्यामुळेच त्यांना पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे नको आहेत. कोणत्या गुन्ह्याच्या किंवा गुन्हेगाराच्या समर्थनार्थ आम्ही हे आंदोलन करत नाही. तसे करायचे असते तर 8 ते 10 दिवस आम्ही थांबलो नसतो तेव्हाच मोर्चे काढले असते.
दमानियांना कोणाची रसद?
लक्ष्मण हाके म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील राजगुरूमध्ये गिरी गोसावी समाजाच्या चिमुरडीची हत्या झाली. मात्र, तिथे शरद पवार भेटायला गेले नाहीत. अंजली दमानिया तर मुंबईहून बीडला गेला. त्यांनाही राजगुरूनगर येथे जावे वाटले नाही. त्यामुळे हे सारे ठरवून सुरू आहे का? अंजली दमानिया यांना कोणी रसद पुरवत आहे का?












Click it and Unblock the Notifications