आरक्षण वादात नितीन गडकरींची उडी; म्हणाले- मी ब्राह्मण, आम्हाला आरक्षण नाही, हेच परमेश्वराचे उपकार
Nitin Gadkari on Reservation : सध्या महाराष्ट्रात मराठा, ओबीसी आणि बंजारा आरक्षणावरून वाद सुरू असताना, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. नागपूरमध्ये आयोजित हलबा महासंघाच्या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, "मी ब्राह्मण आहे आणि आम्हाला आरक्षण नाही, हे परमेश्वराचे आमच्यावरील सर्वात मोठे उपकार आहेत."

माणूस जातीमुळे नाही, तर गुणांमुळे मोठा होतो
नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात जात आणि गुणवत्तेवर भर दिला. ते म्हणाले की, कोणताही व्यक्ती जात, धर्म किंवा लिंगामुळे मोठा होत नाही, तर तो आपल्या कर्तृत्वाने आणि अंगी असलेल्या गुणांमुळे मोठा होतो.
गडकरींनी सांगितले की, महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाला फार महत्त्व दिले जात नाही, परंतु उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दुबे, त्रिपाठी, मिश्रा यांसारख्या ब्राह्मण समुदायाचे मोठे वर्चस्व आहे.
गडकरींनी स्पष्ट केले की ते जात मानत नाहीत. ज्या समाजात मुले चांगली शिकली आहेत, त्या समाजाने केवळ शिक्षणच नाही, तर तरुणांना आर्थिक प्रगतीसाठी योग्य दिशा देणे आवश्यक आहे.
राजकीय हस्तक्षेप आणि चांगल्या कामाचे महत्त्व
काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी सरकारी कामातील राजकीय हस्तक्षेपावरही भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, सरकारी अधिकाऱ्यांवर अनेकदा राजकारण्यांच्या जवळच्या व्यक्तींना कंत्राट देण्यासाठी दबाव असतो. यावर तोडगा काढत, दर्जात्मक काम करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
गडकरी यांचे हे वक्तव्य सध्याच्या आरक्षण आणि सामाजिक ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आहे. त्यांनी एका बाजूला आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यावर आपले वैयक्तिक मत व्यक्त केले, तर दुसऱ्या बाजूला गुणात्मक कामावर भर देऊन समाजाला सकारात्मक संदेश दिला आहे.












Click it and Unblock the Notifications