जयंत पाटील यांच्या घरी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत खलबतं! 22 डिसेंबरला गुप्त बैठक कोण-कोण होतं वाचा
NCP Merger Secret Meeting : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांतील विलिनीकरणाची चर्चा वारंवार जोर धरत आहे. दरम्यान, एबीपी माझाने दिलेल्या खळबळजनक वृत्तानुसार, गेल्या २२ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या निवासस्थानी दोन्ही गटांच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांमध्ये 'वन-टू-वन' चर्चा झाल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

रात्री ९ ते १२: तीन तास रंगली चर्चा!
मिळालेल्या माहितीनुसार, जयंत पाटील यांच्या घरी झालेल्या या बैठकीला शरद पवार गटातील दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड, अशोक पवार, प्राजक्त तनपुरे आणि हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत चाललेल्या या तीन तासांच्या बैठकीत विलिनीकरणाबाबत असलेल्या तांत्रिक आणि वैयक्तिक अडचणींवर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.
बैठकीचा मुख्य अजेंडा: 'या' नेत्यांच्या अडचणींवर तोडगा?
विलिनीकरण झाल्यास ज्या नेत्यांच्या राजकीय भविष्यावर परिणाम होऊ शकतो, अशा नेत्यांशी अजित पवारांनी थेट संवाद साधला.
जितेंद्र आव्हाड
कळवा-मुंब्रा मतदारसंघातून आव्हाड नेतृत्व करतात. जर दोन्ही पक्ष एकत्र आले आणि सत्तेत सहभागी झाले, तर त्यांची भूमिका काय असेल, यावर प्रामुख्याने चर्चा झाली.
प्राजक्त तनपुरे आणि अशोक पवार
प्राजक्त तनपुरे हे कर्डिलेंविरोधात तर अशोक पवार हे माऊली कटके यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. पक्ष एकत्र आल्यास मतदारसंघातील समीकरणे कशी असतील आणि या नेत्यांचे पुनर्वसन कसे होईल, हा या चर्चेचा मुख्य मुद्दा होता.
१७ जानेवारीनंतर आता २२ डिसेंबरचाही संदर्भ!
काही दिवसांपूर्वी १७ जानेवारी २०२६ च्या बैठकीचा व्हिडिओ समोर आला होता. मात्र, आता त्याआधी म्हणजेच २२ डिसेंबरलाही बैठक पार पडल्याचे उघड झाले आहे. यावरून हे स्पष्ट होत आहे की, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील विलिनीकरणाची प्रक्रिया अनेक दिवसांपासून पडद्याआड सुरू आहे. शरद पवारांच्या पक्षातील ज्या नेत्यांना विलिनीकरणाबाबत साशंकता होती, त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी स्वतः अजित पवारांनी पुढाकार घेतल्याचे या बैठकीतून दिसून येते.
हेही वाचा : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचे पुरावे समोर आणणार! 'हे' नेते बैठकीच्या 'इतिवृत्ता'सह करणार गौप्यस्फोट
९ फेब्रुवारीकडे सर्वांचे लक्ष
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशा वेळी रोहित पवार यांनी बैठकीचा व्हिडिओ किंवा लेखी पुरावा सादर केल्यास, ते राजकारणातील सर्वात मोठे गौप्यस्फोट ठरू शकतात. या पुराव्यांमुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.












Click it and Unblock the Notifications