अजित पवारांनी फिरवल्या मराठवाड्यात सोंगट्या; काँग्रेसचे दोन दिग्गज नेते करणार राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभेला यश मिळालेल्या महाविकास आघाडीचं विधानसभा निवडणुकीत मात्र पानिपत झालं. त्यानंतर महाविकास आघाडीत गळती सुरु झाली. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांतील नेते महायुतीत सहभागी होऊ लागले. ही गळती अजूनही सुरुच आहे. सुरुवातीला शिवसेना ठाकरे गट व त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकामागून एक धक्के बसले. आता धक्का लागण्यात काँग्रेसचा नंबर लागला आहे. काँग्रेसचे दोन मोठे नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

कोणते नेते येणार दादांकडे?
भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांचे मेहुणे आणि काँग्रेसचे नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासोबतच मीनल खतगावकर या देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसकडून भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर नायगाव विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता खतगावकर कुटुंब राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
चिखलीकरांनी केली मध्यस्थी
राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्या उपस्थित लवकरच हा पक्षप्रवेश होणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशानंतर आता भास्करराव पाटील खतगावकर देखील राष्ट्रवादीत जाण्याची शक्यात आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी नांदेडमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.
मविआत अस्वस्थता वाढली
महायुतीने विधानसभेत मोठे यश मिळवले. त्यानंतर मविआत अस्वस्थता वाढली. याच अस्वस्थतेतून मविआच्या दिग्गजांनी पक्ष सोडण्याचा मार्ग अवलंबिला असल्याचे सांगितले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी मविआच्या नेत्यांची धडपड सुरु असल्याचे सांगितल जात आहे. महायुतीची ताकद आगामी निवडणुकांपूर्वी वाढत असल्याचे त्यातून दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications