माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात; डोक्याला गंभीर मार, मुलगीही जखमी
Nawab Malik son-in-law accident News : माजी मंत्री तथा अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाच्या कारला भीषण अपघात झाला आहे. यात मलिक यांचे जावई समीर खान यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
कारचालकाच्या चुकीमुळे अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, समीर खान यांच्या कारवरील चालकाचा अचानक अॅक्सीलेटरवर पाय पडल्यामुळे समीर खान कारसोबत काही अंतरापर्यंत फरपटत गेल्याने ते गंभीर जखमी झआले आहेत. दरम्यान, कार चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमकी कशी घडली घटना
मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमध्ये चेकअप केल्यानंतर निलोफर आणि समीर हे बाहेर आले. यावेळी गाडीत दोघे पती-पत्नी बसत असताना चालकाकडून अचानक अॅक्सीलेटरवर पाय ठेवला गेल्यामुळे ही कार समीर खान यांना फरपटत नेऊन एचडीआयएल वसाहतीच्या संरक्षण भिंतीजवळ जाऊन आदळली. या अपघातात समीर खान गंभीर जखमी झाले. तर, निलोफर यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
समीर यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली
दोघांनाही क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल केले असता समीर यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून निलोफर यांच्यावर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या समीर हे आयसीयूमध्ये असून प्रकृती त्यांची चिंताजनक आहे. या अपघातात फुटपाथवर पार्क असलेल्या तीन मोटरसायकल देखील चिरडल्या गेल्या आहेत. तर, कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications