नवनीत राणा नांदेडच्या लोकसभा मैदानात उतरणार?, भाजपकडून का मिळू शकते तिकीट, वाचा सविस्तर
Navneet Rana, Nanded Lok Sabha By-Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकांची देखील घोषणा केलेली आहे. यात नांदेड लोकसभेची देखील घोषणा झाली असून त्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. अशातच नांदेडच्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप नवनीत राणा यांना मैदानात उतरवण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे.
नांदेडची पोटनिवडणूक घोषित झाल्यानंतर काँग्रेसकडून वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात सुरुवातीला राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा असल्याची माहिती आली. मात्र अशोक चव्हाण यांनी मी ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे म्हटले. यानंतर आता भाजप नेत्या नवनीत राणा या नांदेड पोटनिवडणुकीसाठी उतरवण्याची तयारी करत असल्याचे सांगितले जात आहे.

20 नोव्हेंबरला होणार मतदान
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसोबत नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची देखील घोषणा केली. काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेडची जागा रिक्त झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानादिवशीच म्हणजे 20 नोव्हेंबरलाच या लोकसभेसाठी मतदान आणि 23 नोव्हेंबरला निकाल असणार आहे.
जलीलही मैदानात उतरणार?
काँग्रेसने या जागेवर वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. तर एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील नांदेडमधून पोटनिवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. आता भाजप नेत्या नवनीत राणा यांचे नाव या निवडणुकीसाठी समोर येत आहे. त्यामुळे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अमरावतीत राणा यांचा पराभव?
भाजप नेत्या नवनीत राणा या अमरावती लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला. आता नवनीत राणा यांना भाजपकडूनच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत पुन्हा उमेदवारी द्यावी मागणी करण्यात आली आहे. कारण नवनीत राणा यांचे वडील मूळचे पंजाबचे आहेत. नांदेड येथे शीख समाजाचे मोठं तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होऊ शकतो, असं भाजपच्या एका गटाने पक्षश्रेष्ठींकडे कळवले आहे.












Click it and Unblock the Notifications