अजित पवार व नारायण राणेंमध्ये जुंपली; राणे म्हणाले, त्यांनी डोळे तपासण्याचा व्यवसाय सुरु केलाय...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका विधानावर, आज भाजपचे खा. नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. या प्रकारामुळे महायुती जुंपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्र्यांनी डोळे तपासण्याचा नवा व्यवसाय सुरु केला आहे, असं म्हणत राणे यांनी पवारांना जोरदार चिमटा काढला. या प्रकराची आज महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली.

नेमके काय झाले?
मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सना मलिक, नवाब मलिक आणि पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी मुस्लिम समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इफ्तार पार्टीत बोलताना अजित पवार म्हणाले होते की, "जो कोणी आपल्या मुस्लिम बांधवांकडे डोळे वटारून पाहण्याचे धाडस करेल, दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवेल आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल, तो कोणीही असो, त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही किंवा माफ केले जाणार नाही."
काय म्हणाले राणे?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपा खासदार नारायण राणे म्हणाले, "असे दिसते की, अजित पवारांनी डोळे तपासण्याचा एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे." अजित पवारांच्या वक्तव्यावर भाजपकडून जोरदार प्रतिक्रीया आल्या. त्यापैकी नारायण राणे यांच्या प्रतिक्रियेची आज महाराष्ट्रात जोरदार चर्चा रंगली. आता राणे यांच्या या वक्तव्यावर अजित पवार काय उत्तर देतात, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
फडणवीस यांची प्रतिक्रिया
अजित पवार यांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनीही चांगले काम करणाऱ्या आणि देशभक्त व्यक्तीला कोणी त्रास दिला तर त्याला सोडणार नसल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले, "अजित पवार काय म्हणाले हे मला माहिती नाही, कोणत्याही जाती किंवा धर्मातील चांगले काम करणाऱ्या आणि देशभक्त व्यक्तीला त्रास दिला आणि दोषी आढळला तर त्याला सोडले जाणार नाही."












Click it and Unblock the Notifications