शिंदे गटाचे 13 मंत्री ठरले..? दिल्लीत चर्चा, इच्छुक जास्त असल्याने नाराजी भोवण्याचीही शक्यता
Shinde Group Ministership- गेल्या पंचवार्षिकला शिवसेना शिंदे गटाच्या अनेक मंत्र्यांना मंत्रिपदापासून वंचित रहावं लागलं होतं. अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधूनही, मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नव्हता. मात्र आता मुख्यमंत्रीपद हातून गेल्यानंतर किमान मंत्रिमंडळात चांगली खाती हातात घेण्याची तयार शिवसेना शिंदे गटाने केली आहे. शिंदे गटाला तेरा मंत्रिपदे मिळतील, असे बोलले जात आहे. या मंत्र्यांची नावेही आता काही मिडिया हाऊसने प्रसिद्ध केली आहेत.

दोन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार?
पाच डिसेंबरला मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र त्यानंतर अद्यापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. आता तो येत्या दोन दिवसांत होईल, अशी शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वी हा विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपकडून मंत्रीपदासाठी अद्याप काहीच हालचाली सुरु झाल्या नसल्या तरी थेट दिल्लीतून भाजपची यादी येईल, असं सांगितलं जात आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे अनेक नेते गेल्यावेळी मंत्रिपदापासून वंचित राहिले होते. त्यांना या मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याचे समजते.
शिंदे गटाचीही दिल्लीत झाली चर्चा
दरम्यान, गेल्यावेळी असलेल्या सर्वांनाच शिवसेना शिंदे गट संधी देईल, असेही ठरल्याचे समजते. काल दिल्लीत मंत्रिमंडळाच्या संभाव्य नावांवर चर्चा झाली. शिंदे गटाला १० ते १२ मंत्रिपदे मिळतील. मात्र शिंदे गटाने तेरा नावे फायनल केल्याचे समजते. त्यात शिंदे गटाचे गेल्यावेळी असणारे गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभुराज देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर यांचा पुन्हा नव्या मंत्रिमंडळात समावेश असणार आहे. दुसरीकडे गेल्यावेळी मंत्रिपद मिळता मिळता राहिलेले भरतशेठ गोगावले यावेळी पहिल्यांदाच शपथ घेतील, असेही काहींचे म्हणणे आहे.
हे तेरा मंत्री घेतील शपथ
शिवसेना शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराजे देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर या जुन्या मंत्र्यांसह भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे आणि आशिष जैस्वाल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे संभाजीनगर जिल्ह्यातील रमेश बोरणारे, प्रदीप जयस्वाल, आणि विलास भुमरे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. याशिवाय अतुल सावे, प्रशांत बंब हेही मंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. मात्र फक्त १३ जणांना संधी मिळणार असल्याने नाराजांची मनधरणी करण्यासाठी शिंदे गटाला कसरत करावी लागणार आहे.












Click it and Unblock the Notifications