नागपूर हादरले : घरात आई-बाप अन् दोन मुलांचे लटकलेले मृतदेह, आत्महत्या की घातपात?
नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आज सकाळीच हादरले. नरखेड तालुक्यातील मोवाड गावातील एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरातच लटकलेल्या अवस्थेत आढल्याने एकच खळबळ उडाली. एकाच कुटुंबात राहणारे पती- पत्नी आणि दोन्ही मुलांचे असे मृतदेह आढळल्याने चर्चा वाढली.
विशेष म्हणजे या चार मृतदेहांपैकी तिघांचे हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसही चक्रावून गेले. ही हृदयदायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वडील विजय मधुकर पाचोरी (68), त्यांची पत्नी माला विजय पचोरी (55), मुलगा गणेश विजय पचोरी (38) आणि दुसरा मुलगा दीपक विजय पचोरी (36) अशी मृतांची नावे आहेत.

कुटुंब पूर्वीपासून होते कर्जबाजारी
या घटनेनंतर पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली. माहितीनुसार, विजय पाचोरी हे सेवानिवृत्त शिक्षक असून पत्नी माला आणि दोन्ही मुले गणेश आणि दीपक यांच्यासोबत राहत होते. विजय यांनी एक सोसायटी उघडून स्वतःच्या
पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केला होता. या सोसायटीत अनेकांनी पैसे गुंतवले. मात्र, ती सोसायटी बुडाली. त्यानंतर अनेकांनी पैशासाठी तगादा लावला. काहींनी पोलिसात तक्रारी दिल्यानंतर पोलिसांनी विजय यांचा मुलगा गणेशला अटक केली होती. तो नुकताच कारागृहातून सुटून आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण कुटुंब तणावात होते. त्यामुळे घरात पती आणि पत्नीमध्ये वाद सुद्धा होत होते. घरातील वाद एवढ्यात बरेच वाढले होते.
आर्थिक अडचणीमुळे केल्या आत्महत्या
विजय यांनी व्यवसायासाठी सोसायटीमधील पैसे वापरल्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढला होता, असंही स्थानिकांचं म्हणणं आहे. या सगळ्या प्रकारानंतर घरात ताणतणाव वाढला होता. गेल्या एका आठवड्याभरापासून कुटुंबातील वातावरण बिघडले होते. आता न्यायालयातून संपत्ती जप्तीचे आदेश आले होते. विजय पचोरी यांच्याघरी लोक पैसे मागायला येत होते. सतत पैसे मागण्याचा तगादा आणि कुटुंबाची होणारी बदनामी बघता कुटुंबियांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आत्महत्या, घातपात की खून
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणातील चार मृतदेहांपैकी तीन मृतदेहाचे हात पाठीमागे बांधून लटकल्या अवस्थेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रकरणातील वडिलांनीच तिघांची हत्या केली असावी आणि हत्येनंतर स्वत: आत्महत्या तर केली नाही ना? अशीही शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. मात्र, घटनेची सत्यात पोलीस तपासतूनच पुढे येणार आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.












Click it and Unblock the Notifications