पुण्यात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ भरपावसात मविआचे शरद पवारांच्या नेतृत्वात मूक आंदोलन
पुणे : बदलापूरमधील शाळकरी मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर महाविकास आघाडीने आज राज्यभरात बंदचे आवाहन केले होते पण हा बंद बेकायदेशीऱ असल्याचे हायकोर्टाने सांगितल्यानंतर बंद मागे घेण्यात आला. पण आज राज्यभरात ठिकठिकाणी 'निषेध आंदोलन' केली जात आहेत. पुण्यात भरपावसात शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं मूक आंदोलन सुरु आहे. तोंडाला काळा मास्क लावून शरद पवार या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
भरपावसात आंदोलन सुरु
पुण्यात पुणे स्टेशन परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबडेकर पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या वतीने 'मूक आंदोलन' करण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य महाविकास आघाडीतील आजी माजी आमदार, महापौर, कार्यकर्ते याच्या उपस्थितीत पुण्यात आज भर पावसात हे मूक आंदोलन केले जात आहे.

सकाळी 10 वाजल्यापासून नेत्यांसह कार्यकर्त्यांनी तोंडावर काळी पट्टी आणि हातात काळा झेंडा घेऊन मूक आंदोलन सुरु केले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन सुरु असून यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं आवडतं 'रघुपती राघव राजाराम' हे भजन लावले. भर पावसात हातात पोस्टर घेऊन नेते, कार्यकर्ते उपस्थित आहेत.
बदलापूर घटनेवर शरद पवार काय म्हणाले होते?
बदलापुरातील संतापजनक घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती. शरद पवार यांनी बदलापुरात काल उसळलेल्या आंदोलनावर भूमिका मांडत जनतेला आता परिवर्तन हवं असल्याचं म्हटलं. "लोक रस्त्यावर येतात, दळणवळण थांबवतात, लोकांनी अन्यायाविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. काल बदलापूरला हेच पाहायला मिळालं. याचा अर्थ एकच की जनता शांत बसणारी नाही", असं शरद पवार म्हणाले होते.
दरम्यान शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले की, उद्धव ठाकरे शिवसेनासमोर या आंदोलनात सहभागी होणार आहेतय मविआचे नेते राज्यभरात विविध ठिकाणी सहभागी होतील. हा लोकभावनेचा उद्रेक आहे. कोर्टाने बंदला परवानगी देऊन जनभावनेचा आदर करायला हवा होता. कोर्टालासुद्धा मुलीबाळी आहेत. न्यायदेवता ही एक स्त्री आहे. पण या देशात न्यायदेवतेवरच अत्याचार होत आहे म्हणून आमचा लढा आहे. तारखा तारखा मिळणे हा देखील राज्य घटनेवर बलात्कारच आहे.












Click it and Unblock the Notifications