पुण्यात लोकांच्या डोळ्यांदेखत जमिनीत गडप झाला ट्रक, व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
पुण्यातील समाधान चौकात सिटी पोस्ट ऑफिस परिसरात शुक्रवारी मोठा खड्डा पडला आणि त्या खड्ड्यात पुणे महापालिकेचा टेम्पो कोसळला. सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र अख्खा ट्रक या खड्डयात मावला गेल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
घटनेची माहिती मिळतातच अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. टेम्पो मध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि परिसर सुरक्षित करण्यासाठी अग्निशमन विभागाचे 20 कर्मचारी आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट ऑफिसच्या बाजूला महापालिकेचा सेप्टिक टॅंक साफ करणारा ट्रक मागे घेत असताना काही भाग खचला आणि त्यात हा ट्रक पलटी झाला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला.
या भागात सांडपाणी वाहिन्यांबाबत तक्रारी मिळाल्या होत्या . महापालिकेकडून दुरुस्तीचे काम सुरु असताना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास नाले सफाईच्या कामासाठी पुणे महापालिकेचा ट्रक ऑफिसमध्ये पोहोचला होता. त्यानंतर ही घटना घडली.
अजून काय बघायचं राहिलं आहे?
— Prashant Kadam (@_prashantkadam) September 20, 2024
अख्खा ट्रक खड्ड्यात.. पुण्यात जिथे ही घटना घडली त्या चौकाचे नाव समाधान चौक आहे
महाराष्ट्राच्या जनतेला हे समाधान प्राप्त करून देणाऱ्या कंत्राटदाराचा, तिथल्या स्थानिक नगरसेवकांचा, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार झाला पाहिजे. pic.twitter.com/zOxnw4sgcZ
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रक पोस्ट ऑफिसजवळ उभा होता. त्यानंतर अचानक रस्त्याचा काही भाग कोसळला. काही वेळातच तो भूमिगत झाला. हा प्रकार पाहताच तेथे गोंधळ उडाला. ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून टेम्पोतून उडी घेतली आणि जीव वाचवला. ट्रक खड्ड्ड्यात गेल्याने त्यात पाणी साचू लागले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले.
30 ते 40 फूट खड्डा
हा खड्डा 30 ते 40 फूट खोल असल्याचे लोकांनी सांगितले. संबंधित ट्रक पुणे महापालिकेचा आहे. अग्निशमन दलाचे पथक दोरीच्या साह्याने ट्रक ओढण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ट्रक हलला नाही. हा ट्रक बाहेर काढणे खूप आव्हानात्मक होते पण नंतर क्रेनच्या साहाय्याने ट्रक रात्री उशिरा बाहेर काढण्यात यश आले. अखेर हा खड्डा अचानक कसा काय पडला? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. यापुर्वी शहरात कुठेही असे खड्डे पडले नव्हते.
यावर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्विट करत महापालिकेच्या कामावर सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "पुण्यातील रस्त्यात खड्डा पडला, आणि अख्खा ट्रक त्यात गडप झाला! म्हणे तिथे आधी विहीर होती, जी पेव्हर ब्लॉकने बुजवली होती. आता प्रश्न हा आहे, ते पेव्हर ब्लॉक गेले कुठे? ट्रक खड्ड्यात दिसतो, पण मटेरियल काहीच दिसत नाही. विहीर बुजवली, त्यावर रस्ता बांधला आणि ते मटेरियल गायब? पुण्यात काहीही होऊ शकतं, पण अशा तंत्रज्ञानाच्या जनकांवर कारवाई झालीच पाहिजे. अशा घटनांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आहे!"












Click it and Unblock the Notifications