मोठी बातमी! वरळी हिट अँड रन प्रकरणी मिहीर शहाला अटक
मुंबई - मुंबईतील वरळीत भरधाव वेगात बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेला चिरडणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याचा मुलगा मिहीर शहा याला अखेर दोन दिवसांनी मुंबई पोलिसांनी अटक केली. गेली दोन दिवस तो पसार होता. एनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी मिहीर शाहाला शहापूरमधून अटक केली आहे. रविवारी सकाळी अपघात झाल्यानंतर मिहीर शहा पसार झाला होता. त्याचा कसून शोधही पोलिसांकडून घेण्यात येत होता. आता याप्रकरणी त्याला पोलिसांकडून अटक झाली आहे.

महीरची आई-बहिण ताब्यात?
पोलिसांकडून महीरला अटक झाल्यानंतर त्याची आई आणि बहिणीला सुद्धा ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. मिहीरला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्याला आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी न्यायालयात हजर करण्याची शक्यताही आहे.
आतापर्यंत 12 जण ताब्यात
वरळी हिट अँड रन अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहाला शहापूरमधून अटक करण्यात आलं आहे. या प्रकरणात मिहीर शाहाची आई आणि बहिणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच या आरोपीला मदत करणाऱ्या 12 जणांनाही मुंबईच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे.
आधी पार्टी मग हिट अँड रन
मिहीर शहाने अपघातापुर्वी जुहूत वाईस ग्लोबल तापस या बारमध्ये पार्टी केली होती. त्यानंतर मिहीरने भरधाव वेगाने गाडी चालवून वरळीमधील अॅट्रिया मॉलजवळ कावेरी नाखवा या महिलेला धडक दिली होती. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला होता, या अपघातात महिलेचा मृत्यू झाला हता. त्यानंतर तो पसार झाला होता.
आठ पथकाद्वारे घेतला शोध
अपघातानंतर पळालेला मिहीर शहाच्या मागावर मुंबई पोलिसांच्या आठ टीम होत्या. पोलिसांनी मिहीर शहा आणि त्याला मदत करणाऱ्या इतर 12 जणांना अटक केली आहे. मिहीर शाहने अपघातावेळी मद्यपान केलं होतं का, अपघातावेळी नेमकं काय घडलं याबद्दल अधिकची माहिती आता पोलिस घेतील.
राजेश शहाला जामीन
या आधी पोलिसांनी मिहीर शाहाच्या मैत्रिणीचा जबाब नोंदवला होता. तसेच आरोपीचे वडील राजेश शाह आणि ड्रायव्हर राजऋषी सिंहला पोलिसांनी अटक केली होती. पण राजेश शाहाला जामीन मिळाला आहे. दरम्यान, तो बार सील करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. बारचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications