Mumbai News : मुंबईत अचानक रस्ता खचला, 20 फुटांचा खड्डा पडला, पहायला उसळली गर्दी
मुंबईत गुरुवारी सकाळी मोठी दुर्घटना टळली. प्रभादेवी जंक्शन परिसरात रस्त्याचा मोठा भाग अचानक खचला. रस्ता अचानक खचल्याने मोठी दुर्घटना घडू शकली असती, मात्र अपघाताच्या वेळी रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यात एक कार अडकली. रस्त्यावर 15 ते 20 फूट खोल खड्डा तयार झाला असल्याची माहिती मिळत आहे.
रस्त्यावर 20 फूट खड्डा
मिळालेल्या माहितीनुसार, एक कार सुमारे अर्धा तास रस्त्यावरील या खड्ड्यात अडकून पडली होती. स्थानिक लोकांनी खूप प्रयत्न केल्यानंतर कार कशीतरी बाहेर काढण्यात आली. अपघाताच्या वेळी कारमध्ये दोघेजण होते, ते सुखरूप बाहेर पडले. ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. कार खड्डयात अडकल्याने या परिसरात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. तसेच रस्त्यावर खड्डा पडला हे समजताच आजूबाजूला असलेल्या अनेकांनी तो पाहण्यासाठी गर्दी केली.

मुंबईतील प्रभादेवी परिसरात असलेला हा रस्ता सिद्धीविनायक मंदिराकडे जातो. सध्या गणेशोत्सवाचे दिवस सुरु आहेत. या काळात मोठ्या प्रमाणात भाविक सिद्धीविनायक दर्शनासाठी येत असतात. त्यासोबतच या परिसरात अनेक कॉर्पोरेट ऑफिस देखील आहेत. त्यातच आता या रस्त्याला खड्डा पडल्याने मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक दिवसांपासून रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा दावा येथील सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात आहे.












Click it and Unblock the Notifications