'या' जिल्ह्यात पुढील चार तास महत्त्वाचे; मुसळधार पावसाचा अंदाज, शाळांना सुट्टी जाहीर
आज, २६ जुलै रोजी, महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी पुढील तीन ते चार तास महत्त्वाचे असून, या काळात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ, महाड-पोलादपूर तालुक्यातील शाळांना सुट्टी
या पावसाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये, तसेच नागपूरमध्येही सकाळपासून पाऊस सुरू आहे. दुसरीकडे, रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाबळेश्वर परिसरात काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास सावित्री नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून महाड आणि पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि आजही पावसाचा जोर कायम आहे. सकाळपासूनच पावसाने पुन्हा सुरुवात केली असून, हवामान खात्याने पालघर जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी दिली आहे. सलग सुरू असलेल्या पावसामुळे शेती कामांना वेग आला असून, जिल्ह्यात ८० टक्के भात लागवड पूर्ण झाली आहे. मात्र, नद्या आणि नाल्यांना पूर आल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, समुद्रात उंच लाटांचा इशारा
मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आकाश ढगाळ राहील आणि समुद्रात उंच लाटा येण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दुपारनंतर शहरात जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात सध्या ढगाळ वातावरण असून पावसाची रिमझिम सुरू आहे.
या पावसाळी वातावरणात नागरिकांनी सुरक्षित राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.












Click it and Unblock the Notifications