आनंदाची बातमी ! मुंबईसाठी २३८ एसी गाड्यांना मंजूरी; मुंबईतील लोकल गाड्यांना मिळणार नवी झळाळी
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारने मुंबईसाठी २३८ नव्या वातानुकूलित लोकल ट्रेन खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी संसदेत ही माहिती दिली. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना वैष्णव यांनी ही माहिती दिली.

गायकवाड यांनी उपस्थित केला प्रश्न
उत्तर मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्या म्हणाल्या की, "मुंबईची लाईफलाईन आता लाईफ सपोर्टवर आहे. सकाळी ७ वाजता माझ्यासोबत चर्चगेट स्टेशनवर या. विरार ते चर्चगेट माझ्यासोबत प्रवास करा, सकाळी कल्याण ते सीएसएमटी माझ्यासोबत या आणि संध्याकाळी सीएसएमटी ते कल्याण ट्रेनने परत या. त्यानंतरच तुम्हाला वास्तव समजेल. मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना सुमारे २४६८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि २६९७ जण जखमी झाले आहेत."
प्रवासी संघटनेने केले स्वागत
प्रवासी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आता सरकारने फक्त भाडे रचनेचे निराकरण करावे अशी अपेक्षा प्रवासी संघटनेने व्यक्त केली. मुंबईतील लोकल ट्रेन नेटवर्कमध्ये विशेषतः गर्दीच्या वेळेत प्रचंड गर्दी असते. या नवीन ट्रेनच्या समावेशामुळे ही गर्दी लक्षणीयरीत्या कमी होईल, ज्यामुळे दैनंदिन प्रवास अधिक आरामदायी होईल अशी अपेक्षा आहे, असे प्रवाशांकडून सांगितले जात आहे.
एसीची योजना थांबवली होती
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसी गाड्या पूर्णपणे मागे घेण्याची आणि कामगार वर्गाच्या प्रवाशांसाठी नियमित सेवा पूर्ववत करण्याची मागणी केल्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये सर्व लोकल नॉन-एसी गाड्या एसीमध्ये रूपांतरित करण्याची योजना थांबवण्यात आली होती. दोन वर्षांची ही योजना पहिल्यांदा १९ मे २०२३ रोजी सादर करण्यात आली होती. आता नव्या गाड्यांची योजना लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे.












Click it and Unblock the Notifications