मुंबई महापालिकेत NCP 'एकला चलो रे'च्या भूमिकेत?, अमित शहांच्या भेटीनंतर राजकारण तापलं!
Mumbai Municipal Election 2026, NCP VS BJP VS Shivsena : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी सर्वच पक्षांनी कबंर कसली आहे. महायुतीमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मुंबईत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.
निवडणूक निर्णय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीने किमान 50 जागांवर आपली तयारी पूर्ण केल्याचा दावा केल्याने महायुतीत जागावाटपाचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

५० जागांवर राष्ट्रवादीचा दावा; अंतिम निर्णय दादांकडे!
मुंबई महानगरपालिकेत आपले अस्तित्व अधिक प्रभावीपणे सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. निवडणूक निर्णय समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, पक्षाने मुंबईतील ५० प्रभागांमध्ये तगडे उमेदवार आणि संघटन उभे केले आहे.
रणनीती काय?
महायुतीसोबत सन्मानजनक जागा मिळाल्यास सोबत लढायचे, अन्यथा स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याची तयारी पक्षाने ठेवली आहे. महायुतीत राहायचे की नाही, याचा अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत.
दिल्लीत खलबतं, पटेल, तटकरेंनी घेतली शहांची भेट!
एकीकडे मुंबईत बैठकांचे सत्र सुरू असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत: "राज्यात जिथे शक्य असेल तिथे युती करून लढा," अशी सूचना शाहा यांनी दिली आहे.
शरद पवार गटाशी जवळीक?
सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गट आणि शरद पवार गटाने स्थानिक पातळीवर एकत्र येण्याबाबत अमित शाहा यांनी कोणतीही हरकत नसल्याचे संकेत दिले आहेत. या भेटीनंतर उद्याच राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जागावाटपावर सविस्तर चर्चा करणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम: महत्त्वाच्या तारखा
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २९ महापालिकांमधील २८६९ जागांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे.
- टप्पा : तारीख
- अर्ज स्वीकारणे (ऑफलाईन) २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
- अर्जाची छाननी ३१ डिसेंबर २०२५
- उमेदवारी अर्ज मागे घेणे २ जानेवारी २०२६
- चिन्ह वाटप आणि अंतिम यादी ३ जानेवारी २०२६
- मतदान १५ जानेवारी २०२६
- मतमोजणी आणि निकाल १६ जानेवारी २०२६
महत्त्वाचे नियम आणि अटी!
मतदार यादी : या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ची अद्ययावत मतदार यादी वापरली जाईल.
जातीचे प्रमाणपत्र : निवडून आलेल्या उमेदवारांना निकालानंतर ६ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
ऑफलाईन अर्ज : तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी यावेळी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
विरोधकांनी मतदार याद्यांमधील घोळाचा आरोप करत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती, मात्र आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्याने आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी थांबून प्रचाराचा धुरळा उडणार हे स्पष्ट झाले आहे.












Click it and Unblock the Notifications