MMRDA चा नवा प्लॅन : मेट्रोतून उतरुन मुंबईकरांना थेट जाता येणार माॅल, काॅलेजला; मुंबईकरांची चंगळ
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हणजेच एमएमआरडीएने 'मल्टीमॉडल इंटीग्रेशन' अंतर्गत खासगी- सार्वजनिक सहभागातून मेट्रो स्थानकांच्या आसपासची महत्त्वाची ठिकाणे थेट मेट्रो स्थानकांना पादचारी पुलाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मेट्रो स्थानकातून उतरल्यानंतर थेट आपल्या इमारतीत, खरेदीसाठी मॉलमध्ये किंवा शाळा-महाविद्यालयात, कार्यालयात पोहोचता येणार आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

पहिल्या पादचारी पुलाचे लोकार्पण
'दहिसर-गुंदवली मेट्रो ७' मार्गिकेतील बोरिवलीतील देवीपाडा मेट्रो स्थानक ते ऑबेरॉय स्काय सिटी मॉलदरम्यान पादचारी पूल बांधण्यात आला आहे. मेट्रोने हा पहिला पुल प्रायोगित तत्वावर तयार केला होता. आता हा माॅल व पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर विकसीत केलेल्या या पुलाला मुंबईकरांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. बोरिवलीतील ऑबेरॉय स्काय सिटी मॉल थेट जवळच असलेल्या मेट्रो 7 मार्गिकेतील देवीपाडा मेट्रो स्थानकाशी जोडण्यासाठी ऑबेरॉय रियल्टीने एमएमआरडीएकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार प्रस्तावास मान्यता देऊन ऑबेरॉय स्काय सिटी मॉल - देवीपाडा मेट्रो स्थानक दरम्यान पादचारी पूल बांधण्यात आला आहे.
मेट्रोचे ३३६ किलोमिटरचे जाळे
एमएमआरडीए एमएमआरमध्ये ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विणत आहे. सध्या ३३७ किमीपैकी मुंबईत अंदाजे ५९ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्या आहेत. यात मेट्रो १ (घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा), मेट्रो २ अ (दहिसर - अंधेरी प.), मेट्रो ३ (आरे - बीकेसी), मेट्रो ७ (दहिसर - गुंदवली) या मार्गिकांचा यात समावेश आहे. येत्या एक-दोन वर्षात आणखी काही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार आहेत. मेट्रो सेवा ही वाहतुकीचा कार्यक्षम पर्याय ठरवा यासाठी एमएमआरडीएकडून मेट्रो प्रकल्पातील विविध सुविधांना बळकटी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईकरांकडूनही या नव्या धोरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
क्राॅसरेलसोबत सामंजस्य करार
दावोसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉनिक फोरम- २०२५ मध्ये एमएमआरडीए आणि क्रॉसरेलमध्ये एक सांमजस्य करार झाला. या करारानुसार युकेमधील क्रॉसरेल इंटरनॅशनल एमएमआरमधील मेट्रो प्रकल्पांमधील विविध सेवांसाठी आवश्यक ती मदत करणार आहे. विविध सेवांना बळकटी देण्याच्यादृष्टीने क्रॉसरेल एमएमआरडीएला सहकार्य करणार आहे. मेट्रो प्रकल्पातील कार्यप्रणाली, देखभाल, सुरक्षा, डिजिटल परिवर्तन या सेवा आणखी मजबूत करून मेट्रो वाहतूक कार्यक्षम करण्यासाठी आता क्रॉसरेलची मदत होणार आहे.












Click it and Unblock the Notifications