मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: रविवारी 'या' मार्गांवर मेगाब्लॉक, अनेक गाड्या रद्द!
Mumbai Local Mega Block on Sunday 28 September : मुंबई लोकलने नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गांवर रविवारी काही तासांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. या काळात काही गाड्या उशिराने धावतील तर ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा जवळपास पाच तास बंद राहणार आहेत.

मध्य रेल्वे (मेन लाईन) मेगाब्लॉकचे स्वरूप
मध्य रेल्वेवर मुख्य मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांवर विद्याविहार आणि ठाणे या दोन स्थानकांदरम्यान हा ब्लॉक असेल.
- वेळापत्रक: सकाळी ८ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत.
- या ब्लॉकमुळे अनेक महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत:
१. डाऊन जलद मार्गावरील वळवलेल्या गाड्या (विलंब)
विद्याविहार स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या गोरखपूर एक्सप्रेस, जयनगर पवन एक्सप्रेस, तिरुवनंतपूरम नेत्रावती एक्सप्रेस आणि काकीनाडा एक्सप्रेस यांचा समावेश आहे. या गाड्यांना १० ते १५ मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता आहे.
२. अप जलद मार्गावरील वळवलेल्या गाड्या (विलंब)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणाऱ्या गाड्यांना ठाणे स्थानकावर अप जलद मार्गावर वळवले जाईल. यामध्ये सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, सोलापूर-CSMT वंदे भारत एक्सप्रेस, हावडा-CSMT मेल आणि धुळे-CSMT एक्सप्रेस यांचा समावेश आहे. या गाड्यांनाही १० ते १५ मिनिटे उशीर होणार आहे.
ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा पूर्णतः बंद
ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर देखभालीचे काम चालणार आहे.
वेळापत्रक: सकाळी ११:१० ते सायंकाळी ४:१० वाजेपर्यंत.
सेवांवरील कसा होणार परिणाम
या सुमारे पाच तासांच्या कालावधीत ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यानची अप व डाऊन ट्रान्स-हार्बर सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे.
ठाण्याहून सुटणाऱ्या डाऊन सेवा
ठाण्यातून वाशी/नेरूळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा सकाळी १०:३५ ते दुपारी ४:०७ वाजेपर्यंत बंद राहतील.
ठाण्याकडे येणाऱ्या अप सेवा
पनवेल/नेरूळ/वाशी कडून ठाण्याकडे येणाऱ्या सेवा सकाळी १०:२५ ते दुपारी ४:०९ वाजेपर्यंत बंद राहतील.
मुंबईकरांना आवाहन
मेगाब्लॉकमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मुंबईकरांना आवाहन केले आहे की, घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचे वेळापत्रक तपासावे आणि वेळेत पोहोचण्यासाठी पर्यायी साधनांचा वापर करावा.












Click it and Unblock the Notifications