मुंबई हादरली! 5 वर्षीय चिमुरडीवर 16 वर्षीय मुलाने गोळी खावून केला बलात्कार, स्थानिकांचा संताप!
Mumbai child sexual assault : माणुसकीला काळीमा फासणारी आणि अत्यंत संतापजनक अशी घटना मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा परिसरात उघडकीस आली आहे.
अवघ्या 5 वर्षांच्या एका चिमुरडीवर तिच्याच शेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची ही हृदयद्रावक घटना आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, नराधम आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नेमकी घटना काय घडली?
प्राथमिक माहितीनुसार, पीडित ५ वर्षीय मुलगी आपल्या घराबाहेर खेळत होती. त्याचवेळी तिच्या शेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय मुलाने तिला गोड बोलून आपल्या घरात बोलावले. घरात बोलावल्यानंतर या क्रूर आणि नराधम मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
या घटनेची माहिती शेजाऱ्यांना मिळताच त्यांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी पाहिले असता, चिमुरडीच्या प्रायव्हेट पार्टमधून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता.
ही गंभीर परिस्थिती पाहून तातडीने पीडित मुलीला उपचारासाठी जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
'गोळी खाल्ली आणि काही सुचेना...'
या अत्यंत निंदनीय कृत्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित 16 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतल्यानंतर मुलाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण मिळाले आहे.
व्हिडिओमध्ये आरोपी मुलगा सांगतो की, त्याने एक गोळी खाल्ली होती." त्या गोळीचा परिणाम झाल्यामुळे त्याचे डोके जड झाले आणि त्याला काहीही सुचले नाही. त्यानंतर त्याने हे दुष्कृत्य केले. आता कांदिवली पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत, ज्यात आरोपीच्या या 'गोळी'च्या दाव्याची सत्यताही पडताळली जात आहे.
लालजी पाड्यात आक्रोश, फाशीच्या शिक्षेची मागणी
कांदिवलीतील लालजी पाडा परिसरात या घटनेमुळे प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले असून, त्यांनी या नराधम आरोपीला 'फाशीची शिक्षा' देण्याची मागणी केली आहे.
संताप व्यक्त करताना नागरिकांनी म्हटले आहे की, "अशा क्रूर आणि विकृत कृत्ये करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा झाल्यास समाजात जरब बसेल आणि अशा घटनांना आळा बसेल."
एका निष्पाप चिमुरडीवर झालेले हे कृत्य पाहता, स्थानिकांच्या भावना तीव्र झाल्या असून, ते आरोपीला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाऊ नये, यावर ठाम आहेत.
या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कांदिवली पोलीस या प्रकरणाचा तपास जलदगतीने करत आहेत आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.












Click it and Unblock the Notifications